सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कथित ८२ कोटींच्या गैरव्यवहारातून सर्व आजी-माजी संचालक व अधिकारी निर्दोष असल्याचा निर्वाळा चौकशी समितीने आपल्या अहवालात दिला आहे. यामुळे सध्या चालू असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीतील विरोधकांच्या प्रचारातील प्रमुख मुद्दाच बाजूला गेला आहे. चौकशी अधिकारी तथा निवृत्त न्यायाधीश एम. आर. मखरे यांनी चौकशीत संबधितांवर एकही आरोप सिध्द झाला नसल्याचे म्हटले असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ व त्याखालील नियम ७२ नुसार प्रस्तुत चौकशी प्रकरण हे सबळ पुराव्याअभावी अंतिमत: रद्द करुन निकाली काढले.
या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांच्यासह जिल्हा बॅँकेच्या आजी, माजी संचालकांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या दोन वर्षापासून जिल्हा बॅँकेवर याप्रकरणी सतत आरोप करणारे भाजप नेते आ. गोपीचंद पडळकर व आ. सदाभाऊ खोत यांना धक्का बसला आहे. जिल्हा बँकेत मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या कारभाराविरोधात शेतकरी संघटनेचे नेते सुनील फराटे यांच्या तक्रारीवरुन सहकार विभागाने चौकशी सुरु केली. या चौकशीच्या आदेशावर संचालकांनी अपिल करताच तत्कालिन सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिली होती.
आ.पडळकर व आ. खोत यांनी या स्थगिती उठविण्याची मागणी करताच फेरचौकशीचे आदेश देत यासाठी निवृत्त न्यायाधीश एम.आर. मखरे यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती.चौकशीत प्रथम संबधित संचालक व तत्कालीन, विद्यमान अधिकार्यांवर चार प्रकरणात बँकेचे ५० कोटी ५८ लाख ८७ हजार ८८० रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवत याची जबाबदारी निश्चित करून वसुली करण्यासाठी कलम ८८ अंतर्गत चौकशी सुरु करण्यात आली.
या चौकशीतून अनेक मुद्दे वगळल्याची तक्रार आ. खोत व आ. पडळकर यांनी पुन्हा शासनाकडे केली. यानंतर शासन आदेशाने चौकशीत नव्याने सहा प्रकरणांचा समावेश करत बँकेचे ३१ कोटी ३२ लाख ८ हजार ३३४ रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. यामुळे दहा प्रकरणात बँकेच्या ८१ कोटी ९० लाख ९६ हजार २१४ रुपयांच्या नुकसानप्रकरणी बँकेच्या आजी-माजी संचालक, तत्कालीन व विद्यमान अधिकार्यांची चौकशी सुरु होती.
आजी-माजी संचालकांसह ५७ जणांवर चौकशीतील दहा पैकी तीन प्रकरणात आरोप ठेवले होते. अन्य सात प्रकरणातील सुमारे ६५ कोटींच्या नुकसानीप्रकरणी संबंधितांना मखरे यांनी यापुर्वीच क्लिनचीट दिली आहे. उर्वरित संगणक खरेदी, फर्निचर व जाहिरातीच्या खर्च या प्रकरणात सुमारे १६ कोटी ५९ लाखांचे बँकेचे नुकसानप्रकरणी सुनावणी सुरु होती. ही सुनावणी पूर्ण होऊन निवृत्त न्यायमुर्ती मखरे यांनी अंतिम निकाल दिला. चौकशी समितीने या सर्वच प्रकरणात आजी व माजी संचालकांना पुराव्याअभावी निर्दोष ठरवत चौकशीचे प्रकरणच रद्द केले.
