सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेने दहा हजार कोटी ठेवींचा टप्पा पार केला असूुन संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेला २०८ कोटी ८८ लाख रूपयांचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती  बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली. तर आमदार जयंत पाटील यांनी लोकसंख्येच्या तुलनेत जिल्हा बँकेची कामगिरी राज्यात अव्वल असल्याचा दावा यावेळी केला.

आमदार नाईक यांनी सांगितले, गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात संचालक मंडळाने सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी  करत ठेवी आणि कर्ज व्यवसाय वृध्दी करण्यात चांगली कामगिरी नोंदवली आहे. संचालक मंडळाच्या हाती कारभार आला त्यावेळी बँकेकडे ६  हजार ८३५ कोटीच्या ठेवी होत्या.  मार्च २०२६ मध्ये ठेवी १० हजार १२ कोटी झाल्या असून ठेवीतील वृध्दी ४६.४७ टक्के आहे. तर कर्ज वितरण ५ हजार ५४ कोटी वरून ७ हजार कोटी ९५५ कोटीपर्यंत झाले आहे. कर्ज वितरणात ५७.३९ टक्के वाढ झाली आहे.

बँकेचा नेट एनपीए  शून्य टक्के झाला असून  २०२१ मध्ये तो ७.८१ टक्के होता. तर ग्रॉस एनपीए प्रमाण १४.३४  टक्क्यावरून ७.०३ पर्यंत खाली आणण्यात यश आले आहे. बँकेने २०८ कोटी ८८ लाख रूपयांचा ढोबळ नफा  कमावला  असून नफ्यातही ६० टक्के वाढ झाली आहे.सभासदांच्या विश्‍वासाला पात्र ठरल्यामुळे बँकेतील ठेवीमध्ये वाढ होत असून बँकेच्या शताब्दी वर्षात १० हजार कोटी रूपयांच्या ठेवी जमा केल्या आहेत. शेतकर्‍यांची विश्‍वासहर्ता जपण्यात बँकेचे कामकाज यशस्वी ठरल्याचे दिसून येत असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी बोलताना आमदार जयंत पाटील म्हणाले, सहकारी संस्थामध्ये दोन टर्म म्हणजेच १० वर्षें संचालक म्हणून कार्य करणार्‍यांना पुन्हा निवडणुकीस सामोरे जाता येत नसल्याची दुरूस्ती सहकार कायद्यात करण्यात आली आहे. ही दुरूस्ती बर्‍याचजणांना अडचणीची ठरणारी असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. यातून सरकार मार्ग काढेल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपाध्यक्षा जयश्री पाटील, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री आमदार डॉ.विश्‍वजित कदम, संचालक तानाजी पाटील, बाळासाहेब व्हनमोरे, प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब आदींसह मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ उपस्थित होते.