सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहा जागासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी उद्या मंगळवारी होत असून सकाळी अकरा वाजेपर्यंत गुलाल कोण उधळणार हे सकाळी ११ वाजेपर्यंत कळणार आहे. मतमोजणीसाठी सर्व तयारी करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
जिल्हा बँकेच्या मिरज, तासगाव, जत व कवठेमहांकाळ तालुका विकास सोसायटी गटातील चार आणि अनूसुचित जाती, जमाती व विमुक्त जाती जमाती या दोन अशा चार जागासाठी रविवारी जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रावर मतदान पार पडले. तालुका सोसायटी गटातून शंभर टक्के मतदान झाले असून अन्य दोन गटामध्ये ९३.९१ टक्के मतदान झाले आहे. १४४६ पैकी २२९७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
निवडणुकीची मतमोजणी मिरजेेेतील जनावरे बाजारातील शेतकरी भवन येथे होणार आहे. मतमोजणीसाठी आठ टेबल असून २५ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, जतमध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान गोंधळ माजल्याचा प्रकार घडला होता. उमेदवार विनोद पवार यांनी या प्रकरणी आपण निवडणूक निर्णय अधिकार्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले होते. तथापि, याबाबत कोणतीही तक्रार आपणाकडे दाखल करण्यात आली नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.चव्हाण यांनी सोमवारी सांगितले.
