सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. संचालक मंडळाच्या २१ जागासाठी ७५ हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले असून ४०० हून अधिक उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेउन सुमारे एक तास चर्चा केल्याच्या वृत्ताने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडीची प्रक्रिया सुरू असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेक दिग्गज मैदानात उतरले. आमदार डॉ. कदम यांनी काँग्रेस समितीपासून समर्थकासह बँकेत उपस्थित राहून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी डॉ. जितेश कदम, शांताराम कदम यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. डॉ. कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. तसेच खासदार पाटील यांनीही आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.यावेळी त्यांच्यासोबत मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा, आमदार जयंत पाटील यांचे मेहूणे मनोज शिंदेही उपस्थित होते.
तसेच खासदारांच्या पत्नी पूजा पाटील, आ. सुरेश खाडे यांच्या स्नूषा स्वाती खाडे यांनीही महिलासह उपस्थित राहून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आजअखेर माजी खासदार संजयकाका पाटील, आमदार सत्यजित देशमुख, रणधीर नाईक, विराज नाईक, जिल्हा परिषद सदस्या साईतेजस्वी देशमुख, माजी आमदार सुमनताई पाटील, अमोल बाबर, संग्राम देशमुख, तानाजी पाटील आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सत्ताधारी गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करत असताना प्रामुख्याने कपबशी, शिट्टी आणि लिफाफा, नारळ, विमान, छत्री या चिन्हांची मागणी केली आहे.
महायुतीकडून काही जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी महायुतीतील प्रमुख नेते आमदार गोपीचंद पडळकर, सांगली बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल केले जाण्याची शक्यता आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी गुरूवार दि. १ ऑक्टोंबर दुपारी तीन वाजेपर्यंतची अंतिम मुदत आहे.दरम्यान, जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची खासदार विशाल पाटील यांनी भेट घेतली असून उभयतामध्ये सुमारे दीड तास चर्चा झाल्याचा दावा माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केला आहे. जिल्हा बँकेचा कारभार पक्षविरहीत चालविला जावा अशी आपली भूमिका असल्याचे सांगत दोन परस्पर विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये दीड तास झालेली चर्चा निश्चितच हवापाण्याची नव्हती असेही ते म्हणाले. या गौप्यस्फोटामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
