सांगली : जिल्हा  न्यायालयाच्या इमारतीत बॉम्ब ठेवण्यात आल्याचा मेल आज  दुपारी पोलीस नियंत्रण कक्षाला आल्यानंतर पोलीस व सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली. तब्बल पावणे दोन तास तपासणी केल्यानंतर बॉम्ब ठेवण्यात आल्याचा मेल बनावट होता हे निष्पन्न झाल्याने न्यायालयीन कामकाज पूर्ववत करण्यात आले.

सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीत बॉम्ब ठेवला असून न्यायालयाची इमारत उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याने सोमवारी दुपारी एकच खळबळ उडाली. धमकीचा मेल दुपारी मिळताच सांगली जिल्हा पोलिस दलाने तातडीने सुरक्षा यंत्रणा सक्रिय करत बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि श्वान पथकासह संपूर्ण न्यायालयाच्या इमारतीची कसून तपासणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, साधारण दीड वाजण्याच्या सुमारास धमकीचा ई-मेल आला होता. त्यामध्ये दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी न्यायालयाची इमारत उडवून देण्यात येईल, असा उल्लेख मेलमध्ये करण्यात आला होता.

 या मेलमुळे न्यायालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच न्यायालयाच्या चार मजली इमारतीतून वकील, पक्षकार आणि इतर नागरिकांना तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाने आणि डॉग स्कॉडने न्यायालयातील प्रत्येक मजला व परिसराची झडती घेतली. तपासणी करणार्‍यामध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह ३० पोलीस कर्मचारी, सुरक्षा बल, बॉम्ब शोध व निकामी पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस आणि न्यायालयातील पोलीस यांचा समावेश होता. महापालिकेचे अग्निशमन पथक, रूग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आली होती.

सुमारे पावणे दोन तास चाललेल्या तपासणीनंतर कोणतीही संशयास्पद अथवा आक्षेपार्ह वस्तू आढळून आलेली नाही. सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, बॉम्बची धमकी देणारा ई-मेल नेमका कोणी आणि कुठून पाठवला, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सांगली जिल्हा न्यायालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणाला मिळालेल्या या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली होती.