सांगली : येत्या तीन वर्षात म्हणजे सन २०३० पर्यंत जिल्ह्याचा जीडीपी १ लाख ७७ हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार केला आहे. जिल्हा नियोजनमधील २५ टक्के निधी या धोरणात्मक कामांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत केले.

महाराष्ट्राच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात दिलेल्या शुभेच्छा संदेशात ते बोलत होते. या कार्यक्रमास महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्रा, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, विविध विभागांचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना  पालकमंत्री म्हणाले, गत आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेचा ५४५ कोटी रुपयांचा निधी शंभर टक्के खर्च करण्यात आला असून, त्यापैकी १८५ कोटी रुपये जिल्हा धोरणात्मक आराखड्यातील कामांसाठी वापरण्यात आले. चालू वर्षातही ५८९ कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेतून २५२ कोटी रुपये विकास आराखड्यावर खर्च करण्याचे नियोजन आहे. त्यातून जिल्ह्याचा संतुलित आणि चौफेर विकास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्हा नियोजनमधून सन २०२५-२६ करिता पोलीस विभागाकडील पायाभूत सुविधांसाठी १५ कोटी ५७ लाखांच्या प्रस्तावांची प्रशासकीय मान्यता होऊन कामे प्रगतीपथावर आहेत. सहा पोलीस वाहनांवर ९ सीसीटीव्ही कॅमेर्‍यातून वॉच ठेवला जात आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानात आतापर्यंत चार शिबिरांतून महसूल विभागाशी संबंधित विविध योजनांचा जिल्ह्यातील लाखभर लोकांना लाभ दिल्याचे त्यांनी सांगितले.  

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरीबध्दल पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झालेल्या अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस निरीक्षक किरण चौगले, पोलीस हवालदार सागर टिंगरे, अमिरशा फकिर व भावना सुतगुंडे, उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक संजीव झाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, पोलीस निरीक्षक अरूण सुगांवकर, पोलीस हवालदार श्रीपाद शिंदे व सिकंदर तांबोळी, पोलीस निरीक्षक विशाल टकले, विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपूल पाटील, चिंचणी-वांगी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल घुगे यांचा सत्कार करण्यात आला.