सांगली : एकीकडे पश्‍चिम भागातील चांदोली धरण काठोकाठ भरले असताना पूर्व भागातील जत तालुक्यातील तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. जिल्ह्यातील अन्य ८३ पैकी ६ तलाव कोरडे ठाक तर २३ तलावात मृतसाठाच शिल्लक आहे. पावसाचा हंगाम संपत आला तरी प्रकल्पातील पाणीसाठा ३४ टक्केच झाला असून दुष्काळाचे भीषण सावट यंदाच्या हंगामात दिसत आहे. जिल्ह्यात ८३ पाटबंधारे प्रकल्प असून यापैकी शिराळा तालुक्यात ५ प्रकल्प आहेत. या प्रकल्पात यंदा समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.

या पाच प्रकल्पात ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर वाळवा तालुक्यातील दोन प्रकल्पामध्ये ५५ टक्के जलसाठा झाला आहे.
जिल्ह्यातील अन्य तालुक्यात असलेले प्रकल्प आणि आजचा पाणीसाठा असा तासगाव प्रकल्प ७, (पाणीसाठा १३ टक्के), खानापूर ८, (३४ टक्के), कडेगाव ७, (८०), आटपाडी १३, (४१), जत २७, (७), कवठेमहांकाळ ११ (२६), मिरज ३ (७५) ,  तर पलूसमध्ये एकही तलाव नाही.

पावसाचा हंगाम आता समाप्तीकडे पोहचला असून सर्वाधिक चिंताजनक स्थिती जत तालुक्याची आहे. तालुक्यात २७ प्रकल्प असून यामध्ये उपयुक्त पाणीसाठा केवळ सात टक्केच आहे. जिल्ह्यात मध्यम प्रकल्प ५ असून यामध्ये ३९ टक्के म्हणजेच ६८२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून ७८ लघु प्रकल्पात ३३ टक्के म्हणजे १९६३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.

जत तालुक्यात खरीप पेरण्या झाल्या असल्या तरी पावसाअभावी पिके वाळून जात असून आता केवळ परतीच्या मान्सूनवरच अपेक्षा आहेत. मात्र, जिरवणीचा पाउसच यंदा झाला  नसल्याने आहे तो पाणीसाठा वर्षभर पुरेसा ठरणारा नाही. जत तालुक्यातील आठ गावे आणि काही वाडी वस्तीवर टॅंकरने पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. परतीच्या मान्सूनने ही पाठ फिरवली तर टंचाई ग्रस्त गावांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे.