सांगली : संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, कोयनेतील वीजेचे आरक्षित पाणी सिंचन व पिण्यासाठी आरक्षित करावे यासह विविध मागण्यासाठी शुक्रवारी सांगलीत माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा विकास आघाडीच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी खासदार पाटील म्हणाले, अख्खा जिल्हा दुष्काळामुळे होरपळून निघत असताना केवळ जत, मिरज, आटपाडी व कवठेमहांकाळ हे चार तालुकेच दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. ज्या निकषावर हा दुूष्काळ जाहीर करण्यात आला आहे ते निकष कालबाह्य झाले असून वस्तुस्थिती अत्यंत भयावह आहे. याचा विचार करून शासनाने संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी आमची आग्रही मागणी आहे.
तसेच कोयना धरणातील ६७.५० टीएमसी पाणी जलविद्युत प्रकल्पासाठी आरक्षित आहे. वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणारे हे पाणी वाया जाते. यंदा जिल्ह्यातील तलाव, पाणवठे कोरडे ठाक पडले असून पुढील हंगामापर्यंत पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. यासाठी वीज निर्मितीसाठी आरक्षित असलेले पाणी अगोदर पिण्यासाठी आणि सिंचनासाठी आरक्षित करावे अशी आमची मागणी आहे.
याचबरोबर दुष्काळामुळे खरीप वाया गेलेल्या शेतकर्यांना एकरी पन्नास ते एक लाख रूपये पिकानुसार भरपाई जाहीर करण्यात यावी, दुष्काळग्रस्तांच्या मुलांची केवळ परीक्षा फी माफ न करता शैक्षणिक शुल्क माफी द्यावी. म्हैसाळ, ताकारी, टेंभू योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागातील तलावात जलसाठा करण्यात यावा, उपसा बंदी शिथिल करावी आदी १२ मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.
आंदोलनात माजी खासदार पाटील यांच्यासोबत प्रभाकर पाटील, तासगाव पंचायत समिती सभापती अरूणा पाटील, नगराध्यक्षा विजया पाटील, प्रमोद शेंडगे, शशिकांत जमदाडे, सुनील जाधव, नितीन पाटील, अमितपवार, संतोष बेले,सचिन पाटील आदींसह तासगाव, कवठेमहांकाळचे शेतकरी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
