सांगली : एरवी गावचे तलाठी अण्णासाहेबांना शोधण्यासाठी चावडी, तहसिल कार्यालयाला हेलपाटे मारावे लागत होते. आणि जर रविवार असेल तर अण्णासाहेबांचे दर्शन दुर्मिळच. मात्र, यंदा दुष्काळामुळे खचलेल्या बळीराजाला सावरण्यासाठी तलाठी अण्णासाहेब आज ठाण मांडून गावचावडीवर हजर असल्याचे चित्र जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या चार तालुक्यातील विविध गावात दिसून आले.
अभूतपूर्व दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून अशा संकट समयी रविवारची सुट्टी असतानाही शासकीय कर्मचारी पिकांचे पंचनामे करण्याबरोबरच आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी गावपातळीवर पोहचले आहेत. रविवारी सुट्टी दिवशी जिल्ह्यातील चार तालुक्यात बहुतांशी गावातील तलाठी कार्यालयात दुष्काळग्रस्त शेतकरी कागदपत्रे जमा करण्यासाठी रांगा लावून उभे होते.
जिल्ह्यातील मिरज, जत, कवठेमहांकाळ व आटपाडी या चार तालुक्यात कळ एकअन्वये शासनाने पहिल्या टप्प्यात दुष्काळ जाहीर केला असून या चार तालुक्यात पिकांचे पंचनामे करून दहा दिवसात शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना शासनाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. यानुसार गाव पातळीवरील ग्राममहसूल अधिकारी, ग्राम विस्तार अधिकारी आणि कृषी सहायक या तिघांच्या संयुक्त समितीकडून पिकहानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. पिकाची सद्य स्थिती, पेरणीसाठी आलेला खर्च, बियाणावर केलेला खर्च याची माहिती संकलित केली जात आहे. याबरोबरच काही ठिकाणी पीक कापणी प्रयोगही समांतर केले जात आहेत.
आज रविवार हा शासकीय सुट्टीचा दिवस असतानाही अनेक ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी गावचावडीमध्ये उपस्थित राहून नुकसानग्रस्त शेतकर्याकडून कागदपत्रे संकलित करत होते. नुकसान ग्रस्त शेतकर्याकडून आधार कार्ड, सात बारा उतारा, बँक पासबूक आणि फार्मर आयडी यांच्या प्रति जमा करण्यात येत आहेत. ही कागदपत्रे तलाठ्याकडे जमा करण्यासाठी सकाळपासूनच शेतकर्यांच्या रांगा लागल्याचे चित्र काही दुष्काळाने बाधित झालेल्या गावामध्ये दिसत होते.
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी नेलकरंजी (ता. आटपाडी) येथील दुष्काळामुळे नुकसान झालेल्या बाजरी पिकाची शेतात जाउन पाहणी केली. शेतकर्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता आवश्यक असलेली चार कागदपत्रे ग्राममहसूल अधिकार्यांकडे जमा करावीत असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित शेतकर्यांना केले. यावेळी प्रांताधिकारी विक्रम बांदल, तहसिलदार शितल बंडगर यांच्यासह गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी अधिकारी उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी म्हणून जाहीर झालेल्या चार तालुक्यामध्ये सुट्टीच्या म्हणजे रविवारच्या दिवशी देखील पंचनामे सुरू आहेत. वेगाने दुष्काळी भागातील पंचनामे व्हावेत यासाठी महसूल आणि कृषी विभागातील कर्मचार्यांना सुट्टी न घेता पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानुसार आज रविवार असून देखील तलाठी कार्यालयामध्ये तलाठी, सर्कल, कृषी विभागातील अधिकारी हे पंचनामे झालेल्या शेतकर्यांचे शेतीचे कागदपत्रे एकत्र करताना दिसून येत आहेत. यामुळे पंचनामे नंतर लागणारी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तलाठी कार्यालयामध्ये शेतकर्यांनी गर्दी केलेली दिसून येते.
