सांगली : महापालिकेचे मुख्य अग्निशमन  अधिकारी सुनील माळी यांच्यावर झालेल्या खूनी हल्ल्याप्रकरणी पोलीसांनी दोन संशयितांना अटक केली असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण सुगावकर यांनी रविवारी दिली. हा खुनी हा सुपारी देेउन करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. माळी यांच्यावर २७ जानेवारी रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कलानगर दत्तमंदिर येथे खुनी हल्ला झाला होता. या खूनी हल्ला प्रकरणी पोलीसांनी मलिक सलीम शेख (रा. दत्तनगर, बामणोली) व अभिजित चव्हाण (रा. कमला निवास, राममंदिर जवळ, सांगली) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

श्री. सुगावकर यांनी सांगितले, संशयित चव्हाण यांच्या रसिका मार्केटिंग व जीएलसी ग्रूप ऑफ फायर अ‍ॅण्ड सेफ्टी इंजिनिअर्स या दोन कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या परवाना मुदतीत खाडाखोड  केल्यामुळे श्री. माळी यांनी दोन्ही कंपन्या काळ्या यादीत  टाकल्या होत्या. याचा राग मनात धरून माळी यांना जीवे मारण्याची सुपारी दिली होती. यानुसार चौघांनी माळी यांच्यावर पाळत ठेवून धारदार हत्याराने वार केले होते. चार हल्लेखोरापैकी एकाला अटक करण्यात आली असून अन्य तिघांचा शोध घेण्यात येत आहे. या हल्ल्याचा सूत्रधारही पोलीसांच्या हाती लागला आहे. या हल्ल्यात माळी गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले.