सांगली : कोयनेसह विविध धरणातून केला जात असलेला पाण्याचा विसर्ग, अलमट्टीमध्ये करण्यात आलेला पाणीसाठा आणि पश्चिम घाटात सुरू असलेली पावसाची संततधार यामुळे सांगलीकरांत पूराची धास्ती वाढली आहे. पश्चिम घाटातील दूधगंगा वगळता अन्य सर्वच धरणे भरण्याच्या मार्गावर असून राधानगरी धरण शंभर टक्के भरले आहे. कमी झालेला पावसाचा शुक्रवारपासून पुन्हा जोर वाढला असून शुक्रवारी दिवसभर सांगलीसह पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू होती.
पश्चिम घाटात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयनेतून गेल्या दोन दिवसापासून ६१२९ क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. मात्र, धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजलेपासूनसहा वक्र दरवाजे दोन फूटांनी उचलून १० हजार ६३० आणि पायथा विद्युतगृहातून १०५० असा ११ हजार ६८० क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नदीतील पाणी पातळी वाढणार आहे. तसेच रात्री दहा वाजल्यापासून १७ हजार ५८५ क्युसेकने विसर्ग करण्यात येत असल्याचे धरण व्यवस्थापनाकडून कळविण्यात आले आहे.
चांदोलीतून ६ हजार ९०० क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे कृष्णा व वारणा नदीकाठी सतर्कतेचा इशारा पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात ६४ टक्के पाणीसाठा झाला असला तरी राधानगरी धरण १०० टक्के भरले आहे. तर कोयना, धोम, कण्हेर, धोम-बलकवडी, उरमोडी, तारळी यासह चांदोली ही धरणे काठोकाठ भरण्याच्या स्थितीत पोहचली असून या धरणातील पाणीसाठा ८२ ते ९० टक्के झाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह मुक्त पाणलोट क्षेत्रात संततधार पाउस होत असल्याने वारणा, कृष्णा, पंचगंगा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
दरम्यान, कृष्णा नदीतून प्रवाहित होत असलेल्या पाण्यामुळे कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाणी पातळी ५१९.१० मीटरवर पोहचली असून काठोकाठ भरण्यासााठी केवळ ५० सेंटीमीटर उरले आहेेत. शुक्रवारी सकाळी धरणात ११४.५७ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणातील पाण्याची आवक ८५ हजार ८०० क्युसेक प्रतिसेकंद आहे. तर धरणाच्या २६ दरवाज्यातून १ लाख १० हजारांचा विसर्ग करण्यात येत आहे. १५ ऑगस्टअखेर ५१८ ते ५१८.५० मीटर इतकीच पाणी पातळी ठेवण्याचे उभय राज्यांच्या समन्वय समितीत ठरविण्यात आले होते. याची आठवण सांगलीच्या पूर नियंत्रण कक्षाने पत्र पाठवून अलमट्टी धरण व्यवस्थापनाकडे गेल्या आठवड्यात केली होती. तरीही या पत्राकडे दुर्लक्ष करत धरणातील पाणीसाठा एक मीटरने अधिक ठेवण्यात आला आहे. यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठी पूराचा धोका वाढला आहे.
शुक्रवारी सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी १४ फूट ६ इंचावर पोहचली होती. आज सायंकाळपासून कोयनेतील विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने उद्या पर्यंत पाणी पातळी २३ फूटापर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. आज दिवसभर सांगली, मिरज शहरासह पश्चिम भागात संततधार पाउस पडत होता, तर पूर्व भागातील आटपाडी, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू होती. सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाउस कडेगाव तालुक्यात २३.९ मिलीमीटर झाला आहे.
