सांगली : मान्सूनचा हंगाम तोंडावर आला असताना कोयनेपासून अलमट्टीपर्यंतच्या महापूरातील पाण्याचे नियोजन करणार्‍या सांगली कार्यालयातील कार्यभार कोल्हापूरला वर्ग केल्याने जलसंपदा विभागात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला असलेल्या महापूराचे नियोजनच यावेळी कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात २००५ मध्ये महापूराने थैमान घातल्यानंतर सांगली पाटबंधारे विभागाअंतर्गत पूर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या विभागाकडे १ जूनपासून ३१ ऑक्टोंबरअखेर महाबळेश्‍वर, नवजा या कोयनेच्या मुख्य जलस्त्रोतापासून ते विविध धरणाच्या ठिकाणी पडणारा पाउस, यामुळे धरणात येणारा पाण्याचा येवा आणि धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी याच्या नोंदी ठेवण्याची व्यवस्था महापूर नियंत्रण कक्षात आहे. यासाठी १५० हून अधिक कर्मचारी कोयनेपासून अलमट्टीपर्यंत तैनात आहेत. याशिवाय अलमट्टी धरणासह हिप्परगी बंधार्‍यात जलसाठा किती आहे, विसर्ग किती होतो, यामुळे पाण्याची फूग किती काळ राहील, विसर्ग किती हवा याची माहिती संबंधित विभागाकडे ठेवण्यात येते. कोयनेसह कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, दूधगंगा सांगली जिल्ह्यातील चांदोली, सातारा जिल्ह्यातील कोयनेसह धोम, कण्हेर, पाटगाव आदी धरणातून केला जात असलेला पाण्याचा विसर्ग आणि यामुळे नदीपात्रात होणारी पाण्याची वृध्दी याची माहिती सांख्यिकी स्वरूपात सांगलीच्या कार्यालयात उपलब्ध करण्यात येत असते. या माहितीच्या आधारे नदीकाठच्या लोकांना जागृत करणे, कराडमधील कृष्णा पूलापासून ते भिलवडी, आयर्विन पूल, म्हैसाळ बंधारा, कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर बंधार्‍या पर्यंत पाणी पातळीत होणारी वाढ आणि घट यांचे अंदाज बांधून या अंदाजावर नदीकाठच्या नागरिकांना सावध करण्याबरोबरच प्रशासन यंत्रणा सतर्क करण्याची जबाबदारी या विभागाकडे आहे.

गेल्या चार वर्षात महापूराची झळ फारसी बसली नसली तरी पाणी किती वाढू शकते, त्याची झळ कुठेपर्यंत बसणार याची माहिती वेळोवेळी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थाबरोबरच कार्यकर्त्यांनाही देण्यात येते. पडलेला पाउस, धरणात झालेला पाणी साठा आणि नदीतील पाण्याचा होत असलेला प्रतिसेकंद विसर्ग याची माहिती ज्या त्या वेळी मिळत असल्याने महापूरातील हानी टाळण्यास मदत होते. मात्र, जलसंपदा विभागाने दि. २३ मे रोजी काढलेल्या आदेशानुसार मुख्य अभियंता कार्यालय कोल्हापूरला स्थापन करण्यात आल्यानंतर सांगलीतील जलसंपदा विभागाची अनेक कार्यालयेही स्थलांतरित करण्यात आली आहेत. यामध्ये या महापूर नियंत्रण कक्षाचाही समावेश असल्याचे सांगण्यात येते. मान्सून हंगाम सुरू होताना कार्यालयाचे स्थलांतर होत असल्याने यंदाच्या महापूरावर नियंत्रण कोण राखणार हाही प्रश्‍न आहे.

जलसंपदा विभागाकडील काही कार्यालयांचे स्थलांतर झाले असले तरी महापूर नियंत्रणाचे काम पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. याचा फारसा पूरनियंत्रण कामकाजावर होणार नाही. सोमवारपासून पडणारा पाउस, धरणातील जलसाठा, विसर्ग याची माहिती पूर नियंत्रण कक्षातून लोकांच्या माहितीसाठी दिली जाईल.- ज्योती देवकर, कार्यकारी अभियंता, सांगली.