सांगली : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे द्राक्षाची निर्यात ठप्प झाली असून, यामुळे एक हजार कोटींच्या परकीय चलनावर पाणी सोडावे लागत आहे. मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्टमधून जहाजात चढवलेली ३०० कंटेनर द्राक्षे परत पाठविण्यात येत असून, सुमारे ७०० कंटेनर द्राक्षे बंदरातील शीतगृहात पडून आहेत.रमजानच्या पवित्र महिन्यात आखाती देशात मोठ्या प्रमाणात द्राक्षे, डाळिंब, केळी, ड्रॅगन फ्रूट, कलिंगडे निर्यात केली जातात. सांगली जिल्ह्यातून व्यापारी जागेवर द्राक्ष खरेदी करून दुबईमार्गे आखाती देशात पाठवतात.
मात्र, इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर त्याचे पडसाद आखाती देशातील अरब राष्ट्रांत उमटले आहेत. युद्ध स्थिती निर्माण झाल्याने दुबई, अबुधाबी, बहारिन, संयुक्त अमिरात आदी ठिकाणचे बाजार बंद आहेत. त्यामुळे दुबईला माल घेऊन जाणारी जहाजे मुंबई बंदरातच थांबून आहेत.
दुबईला पाठविण्यात येत असलेले द्राक्षाचे ३०० कंटेनर (प्रतिकंटेनर १३ टन) जहाजात चढविण्यात आली होती. मात्र, आता तो माल परत पाठविण्यात येत असून, सुमारे ७०० कंटेनर माल अद्याप बंदरातील शीतगृहात शिल्लक आहे. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांकडून १२० ते १७० रुपये दराने ही द्राक्षे व्यापाऱ्यांनी खरेदी केली होती. आता निर्यातच बंद असल्याने निर्यातयोग्य माल खरेदी होणार नाही. त्यामुळे स्थानिक बाजारातच हा माल खपवावा लागणार आहे.
यंदाच्या हंगामातील ७० टक्के माल बाजारपेठेत गेला असला, तरी उर्वरित माल बागेतच आहे. या बागांना मध्य पूर्वेतील युद्धाचा फटका बसला आहे. उर्वरित मालासाठी स्थानिक बाजारपेठच सोयीची ठरणार असून, माल जास्त झाला तर दर कमी होण्याचा धोका आहे. यंदाच्या हंगामात गेल्या वर्षी मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने ६० टक्के द्राक्षबागामध्ये फळधारणाच होऊ शकली नाही.
यामुळे द्राक्ष उत्पादनात मोठी घट आली आहे. यामुळे उपलब्ध द्राक्षांना दरही चांगला मिळत आहे. देशांतर्गत बाजारात द्राक्षाचा दर ९० ते १४० रुपये किलो आहे.युद्धामुळे द्राक्षनिर्यात थांबली असून, त्याचा फटका बंदरात असलेल्या ५ ते ६ हजार टन द्राक्षाला बसणार आहे. अद्याप बागेत १० हजार टन निर्यातक्षम द्राक्षे असून, बाजारातील दरातच ही द्राक्षे विकावी लागणार आहेत. या वर्षी चांगला दर मिळत असताना युद्धामुळे द्राक्षाला बसलेला फटका नुकसानकारक आहे.– मारुती चव्हाण, उपाध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ
आखाती देशासाठी निर्यातीसाठी ३०० कंटेनर म्हणजे ३ हजार ९०० टन माल जहाजात चढविण्यात आला होता. युद्धामुळे तो परत घेऊन जा असा निरोप मंगळवारी बंदर व्यवस्थापनाकडून आला आहे. त्याचा फटका व्यापारी व शेतकऱ्यांना बसणार आहे.
- संजय जमदाडे, द्राक्ष उत्पादक, तासगाव
