सांगली : शासकीय कामातील अडचणी, दिरंगाई दूर करण्यासाठी नागरिकांना थेट शासकीय यंत्रणेशी संवाद साधून व्यथा मांडण्याची संधी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपलब्ध करून दिली. या संधीचा फायदा घेत जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या १०० हून अधिक नागरिकांनी निवेदन देत आपली गार्हाणी मांडली. यावर १५ दिवसात निर्णय द्यावा असे आदेश संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांना पालकमंत्री पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या संवाद कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र, अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे आत्मीयतेने आणि संवेदनशीलतेने ऐकून घेतले. प्रलंबित असलेले प्रश्न, शासकीय प्रक्रियेतील अडचणी आणि विविध विभागांशी संबंधित गार्हाणी नागरिकांनी मांडली. प्रत्येक निवेदनाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांच्या अधिकार्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या कामांच्या पूर्ततेचा अहवाल पालकमंत्री कार्यालयास व संबंधितास १५ दिवसांत सादर करण्याचे निर्देश देऊन त्याचा आढावा पुढील नागरिक संवाद कार्यक्रमात घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी महसूल, ग्रामविकास, सामाजिक न्याय, आरोग्य, शिक्षण, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, नगरविकास आदि विभागांशी संबंधित गार्हाणे पालकमंत्र्यांसमोर मांडले. प्रत्येक तक्रार बारकाईने ऐकून पालकमंत्री श्री. पाटील यांनी संबंधित अधिकार्यांकडून तत्काळ माहिती घेत त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
