सांगली : सांगली-कुपवाड रस्त्यावर हडको कॉलनीतील रहिवासी भागात गुरुवारी लागलेल्या आगीत प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. कोणाला इजा झाली नाही, मात्र महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीतून ज्वालाग्रही चार इंधनवायूच्या (गॅस) टाक्या बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

कुपवाड रोड येथील लक्ष्मी देऊळ हडको कॉलनी परिसरातील एका निवासी घराला आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. मात्र, महानगरपालिका अग्निशमन दलाने दाखवलेल्या कमालीच्या तत्परतेमुळे आणि शौर्यामुळे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आज दुपारी २:२२ वाजता हडको कॉलनीतील एका घराला आग लागल्याचा संदेश अग्निशमन दलास प्राप्त झाला. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घराच्या आतील भागात आगीने रौद्र रूप धारण केले होते.

आग विझवत असताना जवानांना घरात गॅस सिलिंडर असल्याचे लक्षात आले. अत्यंत धोकादायक परिस्थितीत जवानांनी घरामध्ये प्रवेश केला आणि ३ भरलेल्या व १ रिकामी अशा एकूण ४ गॅस सिलिंडरच्या टाक्या सुरक्षितपणे बाहेर काढल्या. वेळेत सिलिंडर बाहेर काढल्यामुळे कॉलनीतील मोठा संभाव्य धोका टळला.

प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी कासप्पा माने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद माने, अक्षय झुरे, रोहन मुळीक.
वाहन चालक रावसाहेब चव्हाण यांच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले.