सांगली : सांगलीवाडी येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन चोरून नेणाऱ्या राजस्थानातील सराईत आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. या प्रकरणी बहादुर प्रल्हादराम चौकीदार बावरी (वय ३६, रा. कुलीयाना, ता. परबतसर, जि. डिडवाना-कुचामन, राजस्थान) आणि गोपाल तेजाराम बावरी (वय ३४, रा. रावलियावास, ता. डेंगाना, जि. नागौर, राजस्थान) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीची मोटारसायकल, महिंद्रा बोलेरो कॅम्पर, गॅस टाकी, गॅस कटर, दोरखंड, पट्टा, लोखंडी टॉमी आणि रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सांगलीवाडीतील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन १६ सप्टेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चारचाकी वाहनाच्या साहाय्याने ओढून नेले होते. या घटनेनंतर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एटीएम चोरीच्या या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. चोरीसाठी मोटारसायकल आणि चारचाकी वाहनाचा वापर झाल्याचे तपासात स्पष्ट झाले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. २७ सप्टेंबर रोजी पोलीस अंमलदार अनिल कोळेकर, नागेश खरात, सागर लवटे आणि अमर नरळे यांना मिळालेल्या माहितीनुसार राजस्थान पासिंगची चॉकलेटी रंगाची महिंद्रा बोलेरो कॅम्पर अडविण्यात आली.
वाहनात असलेल्या बहादुर चौकीदार आणि गोपाल बावरी यांना ताब्यात घेण्यात आले. वाहनाच्या हौद्यात स्प्लेंडर मोटारसायकल, गॅस टाकी, गॅस कटर, दोरखंड, पट्टा आणि लोखंडी टॉमी आढळून आली. बहादुरच्या अंगझडतीत पाचशे रुपयांच्या ३० नोटा, म्हणजेच १५ हजार रुपये मिळाले.
पोलिसांच्या चौकशीत दोघांनी साथीदार अर्जुन मेघवाल याच्यासह सांगलीवाडीतील एटीएम चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चारचाकी वाहनाला दोरखंडाने एटीएम मशीन बांधून ते ओढून तोडण्यात आले. त्यानंतर मशीन वाहनात टाकून उसाच्या शेतात नेण्यात आले. लक्ष्मीफाटा-कसबे डिग्रज मार्गावरील उसाच्या शेतात एटीएमचे तुटलेले भाग पोलिसांना आढळून आले.
नाशिक, नांदेड, सोलापूरसह तेलंगणातही कारवाया चौकशीत या टोळीने महाराष्ट्रातील नाशिक, नांदेड, सोलापूर तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात अशाच पद्धतीने एटीएम चोरी केल्याची माहिती समोर आली. ग्रामीण भागात खोली भाड्याने घेऊन आरोपी राहत असत. परिसरातील मोटारसायकली चोरी करून त्यावरून एटीएमची रेकी केली जात होती. रात्रीच्या वेळी बोलेरोला दोरखंडाने एटीएम बांधून ते ओढून नेले जात असे. त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्याने मशीन कापून त्यातील रोकड काढली जात होती. पोलिसांच्या माहितीनुसार, ही आंतरराज्यीय टोळी असून महाराष्ट्र, राजस्थान आणि दिल्ली येथे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. बहादुर चौकीदार याच्यावर एटीएम चोरीसह इतर चोरीचे ३० पेक्षा अधिक गुन्हे, तर गोपाल बावरी याच्यावर ४० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.
