सांगली : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने जोर धरला असून शिराळा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून मांगले – सावर्डे पूलावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, तर कोयना धरणात सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एक टीएमसी पाणी आवक झाली आहे.जत, आटपाडी तालुके वगळता जिल्ह्यात सर्वच ठिकाणी रात्रभर पावसाने मुक्काम ठोकला आहे.दमदार पावसाने खरीप पेरण्याची तयारी सुरू झाली आहे.
काल दुपारपासून जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पाउस सुरू आहे.रात्रभर पाउस कमी अधिक पडत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. जिल्ह्याचे कोकण अशी ओळख असलेल्या शिराळा तालुक्यात तर मुसळधार पाउस कोसळत असून तालुक्याच्या पाचही मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तालुक्यात सरासरी ८३.६ मिलीमीटर पाउस झाला असून मंडळ निहाय गेल्या २४ तासात झालेला पाउस असा कोकरूड ९५, शिराळा ६९.५, शिरसी ७२, मांगले ८२.८, सागाव ८१ आणि चरण १०१ मिलीमीटर पाउस झाला.
शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाउस कोसळत असून वारणा नदी दुथडी भरून प्रवाहित झाली आहे. मांगले-सावर्डे मार्गावरील पूलावरून नदीचे पाणी वाहत असल्याने पूलावरील वाहतूक आज बंद करण्यात आली. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ८४ मिलीमीटर पाउस झाला असून गेल्या २४ तासात धरणातील पाणीसाठ्यात अर्धा टीएमसी वाढ झाली आहे. आज सकाळी धरणातील पाणीसाठा साडेबारा टीएमसी झाला असून साठवण क्षमता ३२,४० टीएमसी आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून कोयना येथे १८९ आणि पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वर येथे २३३ व नवजा येथे २१० मिलीमीटर पाउस झाला. २४ तासात धरणात २.१६ टीएमसी पाण्याची आवक होउन पाणी साठा १८.१९ टीएमसी झाला असल्याचे सांगली पूर नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलीमीटर मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज १८.५, जत २.९, खानापूर १९.३, वाळवा ४८.३, तासगाव १७, शिराळा ८३.६, आटपाडी ५.३, कवठेमहांकाळ ९.७, पलूस २२.९आणि कडेगाव ३३.७.
जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून समाधानकारक पाउस सुरू असल्याने शेतकरी आनंदी झाला असून खरीप पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. उघडीप मिळताच पेरण्याची धांदल उडणार आहे. जत व आटपाडी तालुक्यात आज मोठा पाउस झालेला नसला तरी गेल्या आठवड्यात चांगला पाउस झाल्याने या भागात आता पेरण्या सुरू झाल्या आहेत.
कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातही संततधार पाउस होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. जलसंपदा विभागाने नागठाणे, बोरगाव, डिग्रज व सांगलीवाडी बंधार्यातील बरगे काढले असून पाणी प्रवाहित करण्यात आले आहे. संभाव्य आपत्ती स्थितीला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकही दाखल झाले असून या पथकात निरीक्षक संजय मौर्य, उप निरीक्षक रितेशकुमार व अन्य २४ कर्मचारी आहेत. या पथकाकडे पूरस्थितीत आवश्यक साधनेही उपलब्ध आहेत.
सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना १.०७ तर चांदोली धरणात ०.३८ टीएमसी पाणी आवक झाली आहे. या कालावधीत कोयना पाणलोट क्षेत्रात कोयना येथे ४२, महाबळेश्वर ६२ व नवजात येथे ५१ मिलीमीटर पाऊस नोंदला असल्याचे जलसंपदा विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.
