सांगली : हुतात्मा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आणि कारखान्यावरील कर्ज स्वत: वैभवकाका नायकवडी यांनी फेडावे यासाठी गेले दहा दिवस किरण नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली कारखाना कार्यस्थळावर आंदोलन सुरू आहे. कारखान्यावर आर्थिक बोजा होण्यास अध्यक्ष नायकवडी आणि त्यांचे नातलगच कारणीभूत असून कारखान्याचे पैसे अन्य ठिकाणी वळविल्याने हा बोजा झाला असल्याचा आरोप श्री. नायकवडी यांनी केला आहे.
राज्यात चांगला साखर उतारा आणि चांगला दर यासाठी ख्यातकीर्त असलेला हुतात्मा कारखाना कर्जात असून या कर्जास अध्यक्ष नायकवडीच जबाबदार असल्याचा आरोप करून त्यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे, कारखान्यावरील कर्ज त्यांनी स्वत: फेडावे या मागणीसाठी किरण नायकवडी, केदार नायकवडी आणि गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली गेले दहा दिवस आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये कारखान्याचे २१ पैकी १३ संचालक या आंदोलनात सहभागी झाले असून दोन संचालक मृत आहेत. यामुळे संचालक मंडळातही अध्यक्ष नायवकडी यांनी बहुमत गमावले आहे.
पद्मभूषण नागनाथअण्णा नायकवडी यांनी या कारखान्याची उभारणी करून स्वत: पदापासून अलिप्त राहून सहकारातील आदर्श संस्था म्हणून कारखाना चालवला. मात्र, त्यांचे पुत्र वैभव नायकवडी यांनी कर्जमुक्त झालेला कारखाना पुन्हा कर्जबाजारी केला असून सध्या कारखान्यावर ४५० कोटींचे कर्ज आहे. कारखान्याच्या कामकाजात अन्य कुणालाही हस्तक्षेप करू दिला जात नसून एकहाती कारभार चालविला जात असून या कारखान्यातील साखरेचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आली असून उतारा व दरामध्ये सर्वोच्च असलेल्या हुतात्मा कारखाना आर्थिक डबघाईला येण्यास अध्यक्षच जबाबदार असल्याचा आरोप नायकवडी यांनी केला आहे.
अध्यक्ष पदाचा राजीनामा देउन कर्ज फेड त्यांनी स्वत: करावी या मागणीसाठी सभासदांसह १३ संचालकांनी कारखाना कार्यस्थळावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांच्या मागण्याबाबत कोणतेही भाष्य करण्यास अध्यक्ष नायकवडी अद्याप पुढे आलेले नाहीत. तर आंदोलन मागे घ्यावे यासाठी विविध नेत्यांकडून मध्यस्थीचे सुरू असलेले प्रयत्न आंदोलकांनी फेटाळून लावले आहेत. या आंदोलनात अध्यक्षांचे बंधू किरण नायकवडी, केदार नायकवडी, पुतणे गौरव नायकवडी यांच्यासह अॅड. वरूण माने, वसंत वाजे, पोपट अहिर, भीमराव अहिर, अरूण यादव, संजय अहिर, वैभव खोत, संदेश कांबळे, रामचंद्र भाडळकर, गंगाराम सुर्यवंशी, महादेव कांबळे आदींचा समावेश आहे.
