सांगली : अवैध पिस्तूलाची चाचणी करत असताना झालेल्या गोळीबारात एक तरूण जखमी झाला असून या प्रकरणी दोघांना पोलीसांनी रविवारी अटक केली आहे. महिन्यात सांगलीत दुसर्यांदा गोळीबाराची घटना घडली असून घातक हत्याराची राजरोस खरेदीे विक्री होत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
शनिवारी रात्री जुनी धामणी परिसरात एका मोटारीमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली असून या गोळीबारात आदित्यकुमार नाईक हा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
जखमी झालेला नाईकसह शिवतेज सावंत, समर्थ गायकवाड व सुजय भोसले हे चौघेजण मोटारीत (एमएच १० ईई ००६५) यामध्ये बसलेले असताना अवैध देशी बनावटीच्या पिस्तुलाची खात्री करून घेत असताना एकाच्या हातून गोळीबार झाला. या गोळीबारात नाईक हा गंभीर जखमी झाला.
मोटारीत देशी बनावटीच्या पिस्तुलाची विक्री करण्याचे प्रयत्न सुरू असताना ते चालू स्थितीत आहे की नाही हे पाहत असतानाच हा गोळीबार झाला असल्याची माहिती असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातून देण्यात आली. या प्रकरणी चारही संशयिताविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
