सांगली : शाळा दुरूस्ती व शाळा बांधकामाचे देयक काढण्यासाठी ८८ हजाराची लाच घेत असताना बुधवारी सकाळी कंत्राटी शाखा अभियंत्याला जतमधील शासकीय निवासस्थानात लाच लुचपत विभागाने अटक केली.
याबाबत लाच लुचपत विभागाकडून प्रसिध्दी पत्रक आज प्रसिध्दीस देण्यात आले. यानुसार संजय भगवान सुतार या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याला आज सकाळी लाच लुचपत विभागाच्या पथकाने ८८ हजाराची लाच घेत असताना अटक केली.
तक्रारदारांने जिल्हा वार्षिक योजनेअंंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्यांचे बांधकाम व दुरूस्ती करण्याचे काम मजूर संस्थेमार्फत केले होते. या कामाची मोजमाप नोंदवही तयार करून देयक सर्व शिक्षा अभियानाकडील कार्यकारी अभियंत्याकडे मंजुरीला देण्यासाठी सुुतार यांनी ३ देयकासाठी 2२टक्के प्रमाणे ७८ हजार रूपये आणि अतिरिक्त देयकासाठी १० हजार रूपये लाच मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाच लुचपत विभागाने जतमधील विस्तार अधिकारी निवासस्थानात सापळा लावला होता. आज सकाळी ८८ हजाराची लाच घेत असताना अभियंता सुतार यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरूध्द जत पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उप अधिक्षक यास्मिन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, किशोर खाडे आणि कर्मचारी प्रितम चौगुलेे, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, चंद्रकांत जाधव, सीमा माने, सागर नायकुडे, विना जाधव, विठ्ठलसिंग राजपूत आदींच्या पथकाने केली.

