सांगली : चार वर्षाच्या पिडीतेवर लैंगिक अत्याचार करून खून करणार्‍या नराधमाला जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी फाशीची शिक्षा ठोठावली. जत तालुक्यातील करजगी येथे घडलेल्या या घटनेचा तपास करून पोलीसांनी अवघ्या १३ दिवसात आरोपीविरूध्द न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
 
अवघ्या चार वर्षाच्या पिडीतेवर अत्याचार करून तिचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह लोखंडी पेटीत ठेवणारा आरोपी पांडूरंग सोमना कळ्ळी (वय ४६) याला दोषी ठरवून सत्र न्यायालयाने शनिवारी मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली.  नसरापूरच्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर महाराष्ट्रात चिमुरड्या मुलीच्या अत्याचार प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली ही दुसरी घटना आहे. सांगलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या बाल अत्याचार  प्रतिबंधक विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सदरची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकारी वकिल प्रमोद भोकरे यांनी सरकार पक्षाच्यावतीने जोरदार युक्तिवाद केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्या बालिकेचा खून करण्यात आला ती सध्या आजीकडे राहत होती. तिची आई काही दिवसांकरिता कर्नाटक राज्यातील मुधोळ येथे माहेरी गेली होती तर वडिल बांधकाम मजुरीसाठी रत्नागिरीस गेले होते. मुलीच्या घरापासून काही अंतरावर आरोपी पांडूरंग कळ्ळी  याचे घर होते. दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी मुलगी घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. मुलीचा शोध घेत असतानाच याची माहिती पोलिसांनाही कळवण्यात आली.

दरम्यान, मुलीच्या घराच्या मागे राहणारा आरोपी गावकर्‍यांसोबत शोध मोहिमेत सामील होता. मात्र, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. सुरुवातीला पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यानंतर, पोलिसांचा दबाव वाढताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने पीडितेचा मृतदेह आपल्या घरातील पेटीत लपवून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी झडती घेतली असता, मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आला.

 चिमुरड्या मुलीवर अत्याचार करून खून केल्याच्या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली होती. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संघटना, संस्थांनी आंदोलन केले होते. घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास करून अवघ्या १३ दिवसात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने १५ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय तपासणी अहवाल, परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले.  आरोपीवर यापुर्वी दाखल असलेल्या गुन्ह्याचा विचार करून आरोपाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारी वकील श्री. भोकरे यांनी करत जोरदार युक्तिवाद केला. न्यायालयात सलग सुनावणी होऊन साक्षी पुराव्यांच्या आधारे आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.