सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील तिरमलवाडी येथे जन्मदात्या आईने आपल्या १४ महिन्यांच्या मुलीच्या पोटात कात्रीने भोसकून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. श्रीशा क्षीरसागर असे मृत बालिकेचे नाव आहे. अनिता महादेव क्षीरसागर असे संशयित आईचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिता क्षीरसागर हिने घरात असताना आपल्या १४ महिन्यांच्या मुलीवर कात्रीने हल्ला केला. या हल्ल्यात श्रीशाच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच अथवा उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी संशयित आई अनिता क्षीरसागर हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेमागील नेमके कारण, हल्ल्याची परिस्थिती आणि आईची मानसिक अवस्था याबाबत पोलीस तपास करीत आहेत. ती मनोरुग्ण असल्याची माहिती समजली असून तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरु असल्याची माहिती कुटुंबातील लोकांकडून सांगण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी सांगितले. अवघ्या सव्वा वर्षाच्या चिमुकलीचा आईच्याच हातून झालेल्या मृत्यूने तिरमलवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
