सांगली : कृष्णा नदीत पोहत असताना मगरीने केेलेल्या हल्ल्यात एक जेष्ठ नागरिक जखमी झाल्याची घटना मंगळवारी सांगलीतील समर्थ घाट येथे घडली. जखमीवर जिल्हा रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृर्ती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
घनशामनगर येथील जालिंदर उर्फ नाना साळुंखे (वय ६०) हे नेहमीप्रमाणे आज पोहण्यासाठी कृष्णा नदीवर गेले होते. पोहत असताना दबा धरून बसलेल्या मगरीने त्यांच्यावर हल्ला केला. मगरीने साळुंखे याचा डावा खांदा जबड्यात धरला होता. यावेळी पोहण्यासाठी आलेल्या अन्य लोकांच्या लक्षात येताच त्यांनी मगरीच्या तावडीतून साळुंखे यांची सुटका केली. मात्र, त्यांच्या डाव्या खांद्याला व दंडाला मगरीचे दात लागले असून रक्तस्त्रावही झाला. जखमी साळुंखे यांना तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कृष्णा नदीमध्ये बाह्यवळण रस्त्यावरील पूल ते सांगलीवाडी बंधारा या एक किलोमीटर अंतरामध्ये मगरीचा वावर सातत्याने दिसून येतो. हा परिसर मगरींचा अधिवास असल्याने वन विभागानेही या ठिकाणी फलक लावून मगरीपासून सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत.तरीही अनेक जण सकाळी पोहण्यासाठी या परिसरात येत असतात. नदीवर पोहण्यासाठी येणार्या नागरिकांची संख्याही मोठी असून सांगलीतील विसावा मंडळाचे कार्यकर्तेही पोहणार्यासाठी येणार्या नागिरकांना सातत्याने जागृत राहण्याचा सल्ला देत असतात.
