सांगली : विविध धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे सांगलीच्या वेशीवर पूराचे पाणी पोहचले असून काकानगर, सुर्यवंशी प्लॉट आदी परिसरातील नागरिकांनी स्थलांतराची तयारी केली आहे. आयर्विन पूलाजवळ रविवारी नदीची पाणी पातळी ३० फूटापर्यंत पोहचली असून आणखी दोन ते तीन फूट पाणी वाढण्याची शक्यता पूर नियंत्रण कक्षाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी कोयना, चांदोलीसह विविध धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने कृष्णा-वारणा नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वृध्दी होत आहे. यामुळे नदीत असलेले विविध ठिकाणचे बंधारे पाण्याखाली गेले असून बंधार्यावरून होणारी वाहतूक रोखण्यात आली आहे. समडोळी कोथळी हा वारणा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला असून बंधार्यावरून ४ फूट पाणी वाहत आहे. तर नांद्रे-ब्रम्हनाळ हा मार्ग बंधार्यावर सहा फूट पाणी असल्याने बंद आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. म्हैसाळ बंधाराही पाण्याखाली गेला आहे. या शिवाय शिराळा तालुक्यातील चिकुर्डे येथील बंधारा या हंगामात दुसर्यांदा पाण्याखाली गेला आहे.
कोयनेतून दर सेकंदाला ३३ हजार ८२६ क्युसेकने विसर्ग होत आहे, तर चांदोलीमधून ६९०० क्युसेकने विसर्ग होत आहे. कोयनेतील पाणीसाठा ९१.३२ टीएमसी झाला असून धरण ८७ टक्के भरले आहे, तर चांदोलीमध्ये २९.७६ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ८७ टक्के भरले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर बंधारा येथून कृष्णा नदीतून होत असलेला विसर्ग दर सेकंदाला १ लाख ७७५० क्युसेक आहे. तर महापूराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून रविवारी सकाळी दहा वाजलेपासून २० हजार क्युसेकने विसर्ग वाढवून तो आता १ लाख ३० हजार क्युसेक करण्यात आला असल्याचे पूर नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.
कृष्णा नदीची पाणी पातळी ३२ फूटापर्यंत जाण्याची शक्यता पाटबंधारे विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे सांगलीतील जामवाडी परिसरात सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट आदी परिसरातील नागरिक स्थलांतराच्या तयारीत असून महापालिकेने त्यांच्यासाठी निवारा केंद्रही सज्ज ठेवले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला असून गेल्या २४ तासात केवळ १.७ मिलीमीटर सरासरी पाउस झाला. शिराळा तालुक्यात सरासरी १०.२ मिलीमीटर हा सर्वाधिक पाउस नोंदला गेला. मात्र, अन्य ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे.
