सांगली : कमी झालेला पावसाचा जोर, धरणातून कमी करण्यात आलेला विसर्ग आणि अलमट्टीतून वाढविण्यात आलेला विसर्ग यामुळे येउ घातलेेले पुराचे संकट तूर्त टळले आहे. नदीच्या पाण्याला उतार संथ असून २४ तासात केवळ दोन फूटांने पाणी उतरले आहे. मात्र, नदीकाठी धास्ती अद्याप कायम आहे.
कोयना धरणाच्या वक्र दरवाज्यातून होत असलेला पाण्याचा विसर्ग सोमवारी सकाळी ९ वाजलेपासून १० हजार क्युसेकने कमी करण्यात आला आहे. वक्र दरवाज्यातून २३ हजार ८५८ आणि पायथा विद्युतगृहातून १०५० असा २४ हजार ९०८ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. पश्चिम घाटात पडत असलेल्या मुसळधार पाउस आणि धरणातील विसर्ग यामुळे आयर्विन पूलाजवळ काल कृष्णा नदीतील पाणी पातळी २९ फूट ६ इंचावर पोहचली होती. यानंतर मात्र, पाण्याला उतार सुरू झाला असून काल सायंकाळी ५वाजता २९ फूट ६ इंच असलेली पाणीपातळी सोमवारी सायंकाळी ५ वाजता पाणी पातळी २७ फूट ६ इंच झाली आहे. पुराचे पाणी ओसरू लागल्याने नदीकाठी राहणार्या नागिरकांना दिलासा मिळाला असून स्थलांतराच्या तयारीत असलेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
मात्र, चांदोली धरणातील विसर्ग ६ हजार ९०० क्युसेकचा विसर्ग कायम असून यामुळे वारणेचे पाणी पात्राबाहेर कायम आहे. वारणा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठी असलेल्या मळीत पाणी शिरले असून उभ्या पिकात पाणी शिरले आहे. कोथळी समडोळी या मार्गावर अद्याप चार फूट पाणी असून हा मार्ग गेले तीन दिवस वाहतुकीसाठी बंद आहे. वारणेचे पुराचे पाणी आणि कृष्णा नदीतील पाणी यामुळे हरिपूर येथे पाण्याचा प्रवाह विस्तारला असून नदीकाठच्या पिकात पाणी शिरले आहे.
दरम्यान, पश्चिम घाटात पावसाचा जोर ओसरला असला तरी अद्याप मध्यम स्वरूपाचा पाउस सुरू आहे. गेल्या २४ तासात कोयना येथे ३१, महाबळेश्वर येथे ५० मिलीमीटर पाउस झाला तर, चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १२ मिलीमीटर पाउस नोंदला गेला. पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणातील पाण्याची आवक कायम आहे. चांदोलीत २९.७२ तर कोयनेत ९१.४३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
विविध धरणातून होत असलेला विसर्ग आणि मुक्त पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीतील दर सेकंदाला राजापूर बंधार्यावरून कर्नाटकात १ लाख १५ हजार ८३३ क्युसेकचा विसर्ग सुरू असून अलमट्टीतून १ लाख ३० हजार क्युसेकचा विसर्ग सोमवारी सकाळी १० वाजलेपासून दीड लाख क्युसेक करण्यात आला आहे. यामुळे सांगली, कोल्हापूरला निर्माण झालेला पुराचा धोका तूर्त टळला आहे.
