सांगली : कोरड्या पडलेल्या कृष्णा नदीत कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु होताच कारखान्यांनी मळीमिश्रीत सांडपाणी नदीत सोडल्याने हजारो माशांचा तडफडून मृत्यू झाल्याचे गुरुवारी समोर आले. दुषित पाणी व मृत माशांमुळे नदीतीरावर तीव्र दुर्गंधी पसरली आहे.
गेल्या आठवडाभरापासून पलूस तालुक्यात कृष्णा नदीची पाणी पातळी प्रचंड खालावली होती. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार विश्वजित कदम आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी तीव्र आंदोलने उभारली होती. या आंदोलनानंतर अखेर कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले.
मात्र, हे पाणी कृष्णा पात्रात पोहोचत असतानाच साखर कारखान्यांनी आपला स्वार्थी डाव साधत मळीमिश्रित पाणी नदीत सोडून दिले आहे. परिणामी, पलूस तालुक्यातील आमणापूर येथील कृष्णा नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर मृत मासे तरंगताना दिसत असून पात्रात अत्यंत विदारक चित्र निर्माण झाले आहे.
कारखानदारांच्या या बेजबाबदार कृत्यामुळे पात्रातील ऑक्सिजनचे प्रमाण घटल्याने हजारो मासे श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर तोंडे काढून तडफडताना दिसत आहेत. यामध्ये विशेषतः नव्याने जन्मलेल्या असंख्य माशांच्या पिल्लांचा तडफडून मृत्यू होत असून नदीच्या पाण्यावर रासायनिक मळीचा थर साचला आहे. पात्रातून सुटलेल्या तीव्र दुर्गंधीमुळे आमणापूर व परिसरातील कृष्णाकाठच्या गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पाणी आल्याच्या आनंदात असणाऱ्या शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना आता दूषित पाण्याचा सामना करावा लागत असून, नदीचे प्रदूषण करणाऱ्या आणि निष्पाप जलचरांचा बळी घेणाऱ्या बेजबाबदार कारखानदारांवर प्रशासनाने तात्काळ कठोर व फौजदारी कारवाई करावी, अशी जोरदार मागणी कृष्णाकाठच्या जनतेतून केली जात आहे.
कृष्णा नदीकाठच्या बहुतांश सर्वच गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रादेशिक योजना या थेट नदीवरच अवलंबून आहेत. पाणी पातळी घटल्याने आधीच पाणीटंचाई आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या असताना, कारखानदारांनी सोडलेल्या मळीमिश्रित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर अत्यंत गंभीर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
