सांगली : शोले चित्रपटात बसंतीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारण्याची धमकी देणारा वीरुची आठवण करुन देणारा प्रसंग शनिवारी कुपवाड परिसरातील स्वामी मळ्यात घडला. प्रेयसीच्या होकारासाठी मोबाईल टॉवरवर चढून तीन तास ठाण मांडलेल्या तरुणाला मनधरणी करुन पोलीसांनी रुग्णालयात धाडले.

शोले सिनेमा मध्ये बसंतीसाठी विरू थेट पाण्याच्या टाकीवर चढल्याचे आपण पाहिले असेल पण सांगलीत प्रेयसीच्या होकारासाठी एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रेमवीराने थेट मोबाईल टॉवर वर चढून धिंगाणा घातला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस, अग्निशमन दलासह शासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. सांगलीच्या कुपवाड परिसरात आज दुपारी ही घटना घडली. ‘प्रेयसी घटनास्थळी आल्याशिवाय खाली उतरणार नाही’, अशी भूमिका तरुणाने घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अजय जाधव असे या तरुणाचे नाव आहे.

सांगलीतील कुपवाड जवळ राहणारा अजय जाधव हा आज दुपारी अचानक गगनचुंबी मोबाईल टॉवरवर जाऊन बसला. प्रेयसीने आपल्याला होकार द्यावा, अशी मागणी करत तो मोबाईल टॉवरवर चढला. त्यानंतर प्रेयसी घटनास्थळी येत नाही तोपर्यंत आपण खाली उतरणार नसल्याचे त्याने सांगितले. याची माहिती मिळताच कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्याचे पथक तसेच अग्निशमन दलाचे पथक रुग्णवाहिकेसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरविण्यासाठी पोलिसांकडून त्याच्याशी संवाद साधण्याचे आणि समजूत काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

दरम्यान, या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने मोबाईल टॉवरच्या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली. तरुण टॉवरवर चढल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारामुळे उपस्थितांना जुन्या ‘शोले’ चित्रपटातील धर्मेंद्रने पाण्याच्या टाकीवर चढून केलेल्या प्रेमाच्या नाट्यमय प्रसंगाची आठवण झाली. एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे व त्यांच्या पथकाने अथक प्रयत्नाने व्हिडिओ कॉल करून तरुणास आश्वस्त करीत टॉवरुन खाली उतरण्यास प्रवृत्त केले.