सांगली : सांगली महापौर व उपमहापौरपदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने तयारीने आलेल्या नूतन नगरसेवकांची गोवा सहल अखेरच्या क्षणी रद्द झाली. यामुळे पदाधिकार्यांचा सुमारे २० लाखांचा खर्च वाचला असला तरी सहलीचे मनसुबे रचून तयारीने आलेल्यांचा हिरमोड झाला.
महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची बुधवारी अंतिम मुदत होती. चर्चेच्या अनेक फेर्यानंतर भाजपकडून धीरज सुर्यवंशी यांचा महापौर पदासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून गजानन मगदूम यांचा उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्याने संख्याबळ ५५ झाले आहे. महापौर व उपमहापौर निवडीमध्ये १८ सदस्य संख्या असलेला काँग्रेस एकाकी पडल्याने उमेदवारीच दाखल न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे महापौर व उपमहापौर निवडीसाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवड अविरोध निश्चित झाली.
दरम्यान, अखेरच्या क्षणापर्यंत सत्तेत सहभागी कोण होते की नाही याची चिंता भाजपला होती. काठावरचे बहुमत असल्याने कोणताही धोका पत्करायला लागू नये, घोडेबाजार होण्याची शक्यता गृहित धरून भाजपच्या सर्व ३९ सदस्यांना सात दिवसांच्या गोवा सहलीसाठी धाडण्याचे नियोजन करण्यात आले होते. काल एका हॉटेलमध्ये बैठकीस येत असताना कपडे व वैयक्तिक साहित्य, औषधे घेउन बॅगा घेउन हजर राहण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले होते. यानुसार काही नगरसेवक सर्व साहित्य घेउन हॉटेलमध्ये दाखल झाले. महिला नगरसेवक पतीसोबत जाणार असल्याने १०० जणांच्या सहलीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, दुपारी तीनपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची वेळ संपताच विरोधी गटाकडून उमेदवारीच दाखल करण्यात आली नाही. यामुळे तयारींनीशी आलेल्या सदस्यांना परत आप-आपल्या घरी परतावे लागले. गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेला ताण, तणाव, प्रचारातील दगदग यातून विश्रांती मिळण्याची मिळू पाहणारी आयती सहलीची संधी हुकली ती केवळ विरोधकामुळेच.

