सांगली: तब्बल चारशे चौरस फूट व्यास आणि दीड किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा अंतिम भाग रविवारी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कळ दाबून स्फोटाद्वारे खुला झाला आणि पिढ्यानपिढ्या दुष्काळाचा कलंक माथी असलेल्या जतकारांचे कृष्णेच्या पाण्याचे स्वप्न अंतिम टप्प्यात पोहचले. मिरज तालुक्यातील बेळंकी येथे म्हैसाळ जत विस्तारित उपसा सिंचन योजनेच्या बोगदा कामाचा ब्रेकथ्रू मंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते रविवारी झाला. यावेळी खासदार विशाल पाटील, आ. सदाशिव खोत, इद्रिस नायकवडी, गोपीचंद पडळकर, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक ह. तु. धुमाळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता रोहित कोरे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार सुरेश खाडे आदी उपस्थित होते.

बोगदा कामाचा अंतिम टप्पा पूर्ण झाल्याची घोषणा करून मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी भागाला पाणी देण्याचे काम अत्यंत प्रभावीपणे हाताळले आहे. शासनाने दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे स्वप्न पाहिले आहे. या योजनेमुळे जत तालुक्यातील शेतीस मोठा दिलासा मिळणार असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खासदार पाटील म्हणाले, म्हैसाळ प्रकल्प हा २७० दिवसांत ५ टीएमसी पाणी नेण्याचा प्रकल्प असल्यामुळे त्याची ही क्युसेकची क्षमता आहे ती थोडी कमी आहे. जल आयोगाच्या मान्यतेचा प्रस्ताव पाठवत असताना तो जर १५० दिवसांत ५ टीएमसी पाणी न्यायचा जर प्रकल्प केला, तर या ठिकाणी कमी वेळात जास्त पाणी नेता जाईल.

आमदार पडळकर म्हणाले, या योजनेंतर्गत लाभ क्षेत्रातील गावांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळण्यासाठी तिसरी लाईन टाकली तर विस्तारित म्हैसाळ योजनेच्या ६५ गावांमधील अस्तित्वातील सर्व मोठे छोटे तलाव, खरीपामध्ये कृष्णा नदीच्या पाण्याने भरून देणे शक्य होणार आहे. यामुळे खरीपातील चार महिन्यांमध्ये विस्तारीत म्हैसाळच्या लाभ क्षेत्रातील तलावांना ४ टीएमसी पाण्याचा लाभ होऊ शकतो. कार्यकारी संचालक श्री.धुमाळ यांनी प्रास्ताविक तर कार्यकारी अभियंता श्री.कोरे यांनी आभार मानले.

म्हैसाळ विस्तारित उपसा सिंचन योजनेचे सिंचन क्षेत्र २६ हजार ५०० हेक्टर असून पाणीवापर ५ अब्ज घनफुट आहे. या योजनेच्या लाभ क्षेत्रात जत तालुक्यातील पूर्णत: वंचित ४८ गावे व मूळ योजनेतून अंशत: वंचित १७ अशी एकूण ६५ गावे आहेत. या योजनेच्या ५७ किलोमीटर लांबी पैकी ५१ किलोमीटर म्हणजेच ९१ टक्के काम पूर्ण झाले आहे. या योजनेचा बॉटलनेक असलेले बोगदा काम अंतिम स्फोट घेऊन ब्रेकथ्रू करण्यात आला.
कार्यक्रमास संबंधित विभागाचे अधिकारी, सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, अभियंते, कर्मचारी व लाभ क्षेत्रातील पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.