सांगली : मंगळवार पेठेतील  साप्ताहिक बाजाराचा दिवस. नेहमीचाच वर्दळीचा महात्मा गांधी चौक ते मिरज मार्केट असा रस्ता. आणि मंगळवारी सकाळी साडेनउ वाजणेच्या सुमारास  सांगलीकडून येणारी मोटार अचानक विरूध्द दिशेला असलेल्या दुचाकीला ठोकरून राहत्या घरात शिरली. यात कोणालाही इजा झाली नसली तरी घराचे मात्र मोठे नुकसान झाले.

मिरजेतील महात्मा गांधी चौकातून लक्ष्मी मार्केटकडे या रस्त्याने निघालेली मोटार (एमएच १० इइ २३७७) अचानक पणे विरूध्द दिशेला असलेल्या दुमजली घरात घुसली. सुदैवाने घरातील कोणालाही इजा झाली नाही. यावेळी घरातील लोक आतील खोलीत होते. मात्र, या अपघातात घराची दर्शनी  भिंत आणि आतमध्ये असणारे  प्रसाधन गृह यांचे मोठे नुकसान झाले. तत्पुर्वी या वाहनांने दोन दुचाकीना ठोकरले. यात या दोन वाहनांचेही नुकसान झाले.

विजेवर चालणारी मोटार एक महिला चालवत होत्या. अपघातस्थळापासून अवघ्या पन्नास फूटावर वळण आहे. दरम्यानच्या काळात चालक महिलेचा वाहनावरील ताबा सुटला, आणि मोटार थेट घरात घुसल्यानंतर थांबली. ही घटना  घडताच साप्ताहिक बाजारासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी या परिसरात झाली होती. पन्नास फुटावर वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस कर्मचारीही तात्काळ घटनास्थळी धावून आले.

मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही. दुर्घटनाग्रस्त घराचे मालक सौदागर यांनी नुकसानभरपाईची मागणी केली असून संबंधित चालक महिलेवर कारवाईसाठी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍यांनीही घटनास्थळी धाव घेत घडलेल्या घटनेची नोंद घेतली आहे