सांगली : पर्यावरण संवर्धनाबरोबर जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी आर्थिक तरतूद, उत्पन्न वाढीसाठी इंधनपंपाची उभारणी करण्यास प्राधान्य देणारा १ हजार ६५ कोटी खर्चाचे प्रशासकीय अंदाजपत्रक आयुक्त सत्यम गांधी यांनी मंगळवारी स्थायी सभापती अतुल माने यांना सादर केले.
यामध्ये सुधारणा करून स्थायी समितीच्या मान्यतेने सभापतीआगामी वर्षासाठीचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी महासभेत मांडतील. महापालिकेत तीन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर लोकनियुक्त सदस्यांच्या स्थायी समितीकडे आज आयुक्त गांधी व अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांनी सभापती माने यांच्याकडे सादर केले.
महापालिका क्षेत्रात पायाभूत सुविधा पुरविण्यावर भर देण्यात आला आहेच, पण याचबरोबर पर्यावरण पूरक विकास कामेही सुचविण्यात आली आहेत. तसेच महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी महापालिका मालकीचे पेट्रोल व डिझेल पंप उभा करण्याचा प्रस्ताव आहे. या माध्यमातून महापालिकेच्या वाहनांचे इंधन तर कमी दरात उपलब्ध होईलच, पण याचबरोबर बाजार दराने इंधन विक्री करून उत्पन्न वाढविता येईल असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
वीजेवरील खर्च कमी करण्यासाठी सौरउर्जा प्रकल्पाला प्राधान्य देण्यात येणार आहे. मुख्य प्रशासकीय इमारत, शाळा व रूग्णालय, पाणी पुरवठा केंद्र आदी ठिकाणी सौरउर्जा प्रकल्प उभा करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे वार्षिक वीज बिलात २० ते ३० टक्के बचत होईल असा अंदाज आहे.
पर्यावरणाला प्राधान्य देत असताना हरित शहर करण्यासाठी महत्वकांक्षी प्रकल्पासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वाढती वाहन संख्या, यामुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी विजेवर चालणार्या ई बससेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. तसेच सांगलीत नवीन नाट्यगृह उभारण्यात येत आहे. सौर उर्जा, अमृत-०२ आणि मूलभूत सोयीसुविधा यासाठी महापालिकेचा हिस्सा म्हणून ४९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
