सांगली: चालू वर्षापासून महापालिकेकडून भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कर  प्रणाली लागू करण्यात येत असून ही प्रणाली अधिक न्याय,पारदर्शी व सुलभ असेल असे आयुक्त संजीता मोहपात्रा यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत सांगितले. श्रीमती मोहपात्रा यांनी सांगितले, यापुर्वीची कर आकारणी वार्षिक भाडे मुल्यावर आधारीत होती, यामुळे अनेकांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी होत्या.

नवीन बांधकाम केलेल्यावर जादा आकारणी होत होती. या तुलनेत जुन्या घराचे बाजारमूल्य वाढूनही कर कमीच होता. यामुळे करआकारणीत असमतोल दिसत होता. नवीन भाडेमुल्यावर आधारित मालमत्ता कर आकारणीमुळे ही तफावत दूर होणार आहे.

कोणत्याही मालमत्तेवरील कर दुपटीने वाढणार नाही याची खात्री देत श्रीमती मोहपात्रा यांनी सांगितले, भाड्यांने देण्यात आलेल्या मालमत्तांवर करात घट होणार आहे. खुल्या जागेवरील कर नाममात्र असेल. तर ५०० चौरसफूटापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या निवासी मालमत्तांच्या करामध्ये कोणताही बदल होणार नाही.

भांडवली मूल्य प्रणालीचा अर्थ सांगताना आयुक्तांनी सांगितले, बाजार मूल्य दर, मालमत्तेचा वापर, इमारतीचे स्वरूप व प्रकार, इमारतीचे वय आणि बांधकाम क्षेत्रफळ याचा विचार करून सुसंगत वैज्ञानिक पध्दतीने मालमत्तेचे भांडवली मूल्य निश्‍चित करणे होय. नवी प्रणाली समन्यायी, पारदर्शक व सुटसुटीत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.