सांगली : बैलगाडी शर्यतीवेळी झालेल्या किरकोळ वादातून पाटगाव येथील तरूणाचा खून केल्या प्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी रविवारी दिली.
पाटगाव (ता. मिरज) येथील ज्ञानेश्वर उर्फ माउली पाटील (वय २७) याचा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली होती. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात रितसर तक्रारही दाखल करण्यात आली.याबाबत तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला संशयित गडदोबा डोंगराजवळ डाकोबा खिंडीत संशयित लपून बसल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलीस पथकाने खिंडीत जाउन अक्षय माने (वय ३०, रा. योगेवाडी), सर्वेश देशमुख (वय १९, रा.करोलीएम) व विक्की उर्फ धनराज पवार (वय २३, रा. करोली एम) या तीन संशयितांना ताब्यात घेतले.
या तीन संशयितांनी खूनाची कबुली दिली आहे. बेंदूर सणावेळी डोंगरवाडी येथे बैलगाडी शर्यती पाहून येत असताना मृतासोबत वाद झाला होता. या वादातून करोली गावी मारामारीही झाली होती. या वादातूनच खून करण्यात आल्याची कबुली संशयितांनी दिली असल्याचे पोलीस निरीक्षक श्री. झाडे यांनी सांगितले.
