सांगली : तीव्र उष्म्यानंतर बुधवारी जिल्ह्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. शेतीतील पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना अजून मोठ्या पावसाची गरज असली तरी हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उष्म्यापासून दिलासा मिळाला आहे.सांगली व मिरज शहरात सकाळी आणि दुपारी पावसाच्या सरी कोसळल्या. सकाळी दहा वाजेपर्यंत तीव्र उन्हाच्या झळा बसत असतानाच अचानक अकरानंतर पावसाला सुरूवात झाली. पावसाने सखल भागात पाणी साचले. तर रस्त्यावर पाणी वाहते झाले. अचानक आलेल्या पावसाने दुचाकी वाहन चालकांना आसरा शोधावा लागला. तर फेरीवाले, पथ विक्रेत्यांची या पावसाने तारांबळ उडाली.
मिरज तालुक्याच्या पूर्व भागात मालगाव, नरवाड, म्हैसाळ परिसरात मध्यम स्वरूपाचा काल पाउस झाला. तर आजही मालगाव, गुंडेवाडी परिसरात पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्यात काल रात्री मध्यम स्वरूपाचा पाउस झाला, तर आटपाडी, खरसुंडी, दिघंची परिसरात आज दिवसभर ढगाळ हवामन होते.बर्याच दिवसाच्या प्रतिक्षेनंतर पावसाला सुरूवात झाली असली तरी पेरणीपूर्व मशागतीसाठी आणखी पावसाची गरज आहे. नांगरटीच्या रानात अद्याप ढेकळे विरघळण्यासाठी मोठ्या पावसाची गरज असल्याचे शेतकर्यांनी सांगितले, कृषी विभागाकडूनही १० जूननंतरच पावसाची मान्सूनची सुरूवात होईल, तोपर्यंत खरीप पिकाच्या पेरणीसाठी घाई करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, सांगली महापालिका क्षेत्रात महापालिकेने नालेसफाईच्या कामाचा ठेका निवडणुकीमुळे लांबणीवर पडला आहे. ठेकेदाराला कार्यारंभ देण्यासाठी महापालिका प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविले असून तोपर्यंत मान्सून सुरू झाल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नालेसफाईची कामे सुरू करण्यात आली आहेत. नाल्यातील पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे.
