सांगली : अल्पसंख्याक समाजाचा एकही प्रश्‍न विधीमंडळात उपस्थित न करता केवळ सत्ता भोगने एवढाच उद्योग करणार्‍या आमदार इद्रिस नायकवडी यांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक जमील बागवान यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत केली.

श्री. बागवान यांनी सांगितले, आ.  नायकवडी यांना उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांनी अल्पसंख्याक समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी दोन वर्षासाठी विधान परिषदेवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली होती. मात्र, या संधीचा उपयोग न करता केवळ स्वार्थासाठीच ते पदाचा वापर करत असल्याचे दिसून येत असून पक्षाचे नेते पार्थ पवार यांनीही त्यांना राजीनामा देण्याची सूचना दिली होती. मात्र, केवळ अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधीत्व करत असल्याची ढाल पुढे  करून आमदारकी राखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.महापालिका निवडणुकीत केवळ आपल्या प्रभागात मुलाच्या विजयासाठीच त्यांनी प्रयत्न केले.

पक्षाच्या अन्य उमेदवारांच्या विरोधात त्यांनी भूमिका बजावली असल्याने पक्षाला, पक्ष नेतृत्वाला फसविण्याचा त्यांचा उद्योग आहे. यापुर्वी माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी आघाडीच्या सत्तेच्या काळात महापौर पदाची संधी दिली, ज्यावेळी मुदतपूर्तीनंतर राजीनामा देण्यास सांगितले. त्यावेळी आ.पाटील यांची फसवणूक केली आहे. याबाबत आपण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांची भेट घेउन मागणीचे निवेदन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

रविवारी आयोजित करण्यात आलेले महाआरोग्य शिबीर हे  एक प्रकारचे ढोंग असून केवळ स्वत:चे महत्व वाढविण्याचाच हा उद्योग आहे. याला आता  अल्पसंख्याक समाज बळी पडणार नाही. विशेषत: मुस्लिम समाजही त्यांच्या पाठीशी नसल्याने पक्षाने याची दखल घेउन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.