सांगली : महापालिकेच्या सभेत शहरातील अपुर्‍या पाणी प्रश्‍नावरून काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष राजेश नाईक व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गटनेते माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यात वादावादी झाली. या वादावादीत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्नही झाला. अन्य सदस्यांनी समजूत घालून या वादावर पडदा टाकला.

महापौर धीरज सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली महासभा आज बोलावण्यात आली होती. सभेच्या प्रारंभी वंदेमातरम पूर्ण क्षमतेने होत असताना  काही सदस्यांनी आक्षेप घेतला. मात्र, शासन आदेशानुसार पूर्ण सहा कडव्याचे वंदेमातरम होणे गरजेचे असल्याचे सांगितल्यानंतर हा विषय बाजूला पडला.

महापौरांनी विषय पत्राचे वाचन करण्याचे निर्देश देत असतानाच शहरातील अपुर्‍या पाणी पुरवठ्याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या महिला सदस्यांनी रिकाम्या घागरी घेउन महापौरांच्या आसनाकडे धाव घेतली. महापौरांनी विषय पत्रिकेवरील अन्य विषय होउ दे यावर नंतर बोलण्यास संधी देतो असे सांगितले.

यावर महिला सदस्या जागेवर जाउन बसल्या. यावेळी महापौरांनी आसनासमोरील घागरी काढण्याची  सूचना दिली असता श्री. बागवान यांनी चेष्टा करण्याचा प्रयत्न केला. यावर काँग्रेसच्या नाईक यांनी उभे राहून महत्वाच्या पाणी प्रश्‍नावर चेष्टा कसली करता असा सवाल केला. यातूनच बागवान आणि नाईक यांच्यात बोलाचाली झाली. दोघांनीही एकमेकांना एकेरी उल्लेख केला. यावर दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत असताना विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण यांनी नाईक यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, तर बागवान  यांनाही सत्ताधारी गटाच्या अन्य सदस्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, अपुर्‍या पाणी प्रश्‍नावर दि. २३ मार्च रोजी विशेष सभा बोलावण्याचे आदेश महापौर सुर्यवंशी यांनी दिले. या दरम्यान, अपुर्‍या पाणी पुरवठ्यावर आयुक्त गांधी यांनी लक्ष घालून पाणी पुरवठा पुरेसा होणेसाठी योग्य ते उपाययोजना करावी असे सांगितले. अपुर्‍या पाणी पुरवठा होण्याामागील कारणावर विशेष सभेत चर्चा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

शहरातील दिवाबत्तीबाबत समुद्रा कंपनीला देण्यात आलेल्या ठेययाबाबत कायदेतज्ञांकडून सल्ला घेउन निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या विषयावर विरोधी पक्ष नेते चव्हाण यांनी दुसर्‍या कंपनीकडे ठेका देत असताना बाजारभाव आणि कंपनीचे दर यामध्ये मोठी तफावत असल्याचे निदर्शनास आणून दिेले.