सांगली : लाडक्या बहिणींची मते खेचण्यासाठी सांगली महापालिका निवडणुकीत महायुतीतीलच तीनही घटक पक्षांची चढाओढ सुरू आहे. श्रेयवादासोबतच लाडक्या बहिणींना आरामबसमधून देवदर्शन घडविण्यात येत आहे. यासोबतच सेंक्रांतीचे वाण म्हणून वजनदार भेटवस्तू देण्याचे नियोजनही करण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींच्या मतांमुळे महायुतीला चांगले यश मिळाले. असेच यश मिळवण्यासाठी महापालिका निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरलेले भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आाणि शिवसेन (शिंदे) पक्ष यांच्यात चढाओढ सुरू आहे. सत्तेत एकत्र असलेले तीनही पक्षाकडून लाडक्या बहिणींना दर महिन्याला देण्यात येत असलेले पैसे केवळ आमच्याच पक्षामुळे मिळत असल्याचे सांगितले जात आहे.
यासाठी तिजोरी आमच्या नेत्यांच्या हाती असल्याने त्यांच्या सहीशिवाय ही योजनाच चालू शकत नाही असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे, तर तिजोरीचा मालक आमच्या पक्षाचा असल्याने आमच्याशिवाय लाडक्या बहिणींना पैसेच मिळू शकत नसल्याचे दावा भाजपकडून केला जात आहे. यासोेबतच आता लाडक्या बहिणींना लखपती करण्यात येत असल्याचा दावा करून मते मागितली जात आहेत. तर शिवसेना शिंदे पक्षाकडून लाडक्या बहिणीसाठी मासिक मदत आमच्या नेत्यांनेच सुरू केली असे सांगून नगरविकास खाते आमच्या नेत्यांच्या हाती असल्याने नागरी समस्यांसाठी निधी आमचाच नेता देउ शकतो असे प्रचारात मुद्दे मांडले जात आहेत.
विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींचे मतदान निर्णायक ठरत असल्याचे लक्षात आल्यानंतर खास महिलांसाठी देवदर्शनाच्या सहलींचे आयोजन उमेदवारांकडून करण्यात येत आहे. मंगळवारी अंगारकी संकष्टीचे औचित्य साधून मिरजेतील सहा आरामबसमधून महिला वर्गांना गणपती पुळे येथील गणेश दर्शन घडविण्यात आले. तर बुधवारी काही महिलांना पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.
महापालिकेसाठी दि. १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. तत्पुर्वी १४ जानेवारी रोजी संक्रांतीचा सण आहे. या सणामध्ये महिला वर्गाकडून सुवासिनी महिलांना वाण म्हणून एखादी वस्तू देण्याची प्रथा आहे. या प्रथेचा मतदानासाठी वापर करण्याचे नियोजन काही महिलांच्या माध्यमातून केले जात आहे. वाण म्हणून वजनदार वस्तू देउन या बदल्यात मताचे दान मागितले जाणार आहे. यामध्ये अन्न शिजवण्यासाठी कुकर, जेवणाचा डबा, महिलांसाठी खास किमती पर्स गुळाच्या लहान भेलीसोबत देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
मात्र, निवडणूक आयोगाकडून निवडणुकीदरम्यान, दिल्या जाणार्या भेट वस्तूवर करडी नजर राहणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त सत्यम गांधी यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे या भेट वस्तू सार्वजनिक समारंभ आयोजित न करता घरपोच देण्याचा उपाय योजला जाण्याची चिन्हे आहेत.
