सांगली : अलकुड एस (ता. कवठेमहांकाळ) येथील सदाशिव जगन्नाथ चौगुले यांच्या खूनप्रकरणी सौरभ विकास शिद (वय २१) आणि श्रीकांत चंद्रकांत पाटील (वय २०, दोघे रा. नेर्ले, ता. वाळवा) या दोघांना सांगली येथील जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक दोनचे न्यायाधीश एस. एम. चंदगडे यांनी मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोन्ही आरोपींना भादंवि कलम ३०२ अन्वये दोषी ठरवून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशीही शिक्षा सुनावण्यात आली.

अलकुड (एस) येथे १० ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान सदाशिव चौगुले यांचा धारदार हत्याराने तसेच डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. सदाशिव चौगुले हे आरोपींच्या घरात जाऊन त्यांना धमकी देत असल्याचा तसेच त्यांनी वाघजाई मंदिरात चोरी केल्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यातून आरोपींनी संगनमताने कट रचून चौगुले यांचा खून केल्याचा आरोप होता. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार ठिकणे यांनी केला. पोलीस शिपाई विनोद चव्हाण यांनी तपासात मदत केली. तपासादरम्यान ३० हून अधिक साक्षीदारांची चौकशी करण्यात आली. विविध पंचनामे करून सीसीटीव्ही फुटेज, हत्यारे आदी महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींचे फोटो तज्ज्ञांकडे अभिमतासाठी पाठविण्यात आले होते. न्यायालयीन सुनावणीदरम्यान फिर्यादीसह मयताच्या जवळच्या नातेवाइकांपैकी काही महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाले.

मात्र, तपासाची गुणवत्ता, तज्ज्ञांचे अहवाल, वैद्यकीय पुरावे, तपासी अधिकाऱ्याची साक्ष आणि अन्य अनुषंगिक पुराव्यांचा न्यायालयाने गांभीर्याने विचार केला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरविले. या खटल्यात डॉक्टर, तपासी अधिकारी तसेच न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेतील तज्ज्ञ श्रीमती कोरवी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तज्ज्ञ साक्षीदार आणि तपासी अधिकाऱ्यांची साक्ष अनेक महिने सुरू होती. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. विनायक मधुकर देशपांडे यांनी काम पाहिले.