सांगली : निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रासह विविध राज्यातून आलेल्या ८२ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्राच्या ५९ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची सांगता झाल्यानंतर सांगलवाडी येथील समागम मैदानावरच या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या विवाह सोहळ्यामध्ये सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी वधू-वरांचे अभिनंदन करुन गृहस्थ जीवनातील जबाबदार्या समजून घेऊन त्या एकोप्याने, आदराने व प्रेमाने कुशलपणे निभावण्याची शिकवण दिली. आपल्या सामाजिक दायित्वांचा निर्वाह करत असतानाच सदोदित सेवा, सिमरण, सत्संगाशी जोडून राहून एकमेकांच्या सहयोगाने आपली भक्ती आणखी मजबूत करण्याची प्रेरणा दिली.
या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये पारंपारिक जयमाला तसेच निरंकारी विवाहाचे विशेष चिन्ह सांझा-हार (सामायिक हार) प्रत्येक जोडीच्या गळ्यामध्ये मिशनच्या प्रतिनिधींमार्फत घालण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित वधू-वरांशी संबंधित कुटुंबीय आणि अनुयायी यांची उपस्थिती होती.
सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापुर, सोलापुर, धाराशिव, मुंबई, ठाणे, पुणे, डोंबिवली, पालघर, छत्रपती संभाजी नगर, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नाशिक, लातुर, बीड, परभणी, नागपुर, वर्धा, गोंदिया, रत्नागिरी व सिंधुदूर्ग तसेच अन्य राज्यांपैकी उत्तर प्रदेशातील गोरखपुर, गाजीपुर व अलाहाबाद, कर्नाटकातील बेळगावी, उडुप्पी (कोंडापुर) आणि छत्तीसगड येथील अंबिकापुर (सुरगुजा) इत्यादी ठिकाणांहून आलेल्या ८२ जोडप्यांचा समावेश होता.

