सांगली : कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खडेबोल सुनावल्यानंतर जाग आलेल्या पोलीसांनी शनिवारी रात्री महापालिका क्षेत्रात धडक कारवाई करत सार्वजनिक ठिकाणी अंधाराचा फायदा घेत ओपन बार करीत नशापान करणार्या ७५ जणांवर कारवाईचा बडगा उगारला.
महापालिका क्षेत्रात अंधार्या जागी, खुले भूखंड, रस्त्यावर मद्यपान करणार्यांची संख्या वाढत आहे. गांजासारख्या अंमली पदार्थांचे सेवन करून गुन्हेगारी वाढत आहे. नशेच्या अंमलाखाली वाटसरूंना अडवून लुटण्याचे प्रकार तर घडत आहेतच, पण किरकोळ पैशासाठी खूनाचे प्रकारही घडत आहेत. याबाबत आढावा बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी पोलीस प्रशासनाना धारेवर धरत केवळ कागदोपत्री कारवाईचा खेळ नको, तर नशेखोरांवर जरब बसेल अशी कारवाई करण्याचे आणि कायद्याचा धाक निर्माण झाला पाहिजे अशी कृती अपेक्षित असल्याचे सांगितले.
या नंतर पोलीसांनी सांगली, मिरज व कुपवाड शहरातील सांगली, मिरज शहर, कुपवाड औद्योगिक वसाहत, विश्रामबाग, संजयनगर आणि महात्मा गांधी चौक या सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीसांनी शनिवारी रात्री धडक कारवाई केली. अंधार्या जागेत लपून नशा करणारे, जवळ घातक हत्यार बाळगून असलेले, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारे अशा लोकांवर कारवाई केली. सांगली शहरात २५ जणाविरूध्द तर मिरज व कुपवाडमध्ये ५० जणांवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले.
उप अधिक्षक प्रणिल गिल्डा यांच्या नेतृत्वाखाली पायी व दुचाकीवरून गस्त घालत पोलीसांनी ही कारवाई केली. यामध्ये पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सुधीर भालेराव, अरूण सुगावकर, संतोष कदम, किरण चौगले, सहायक निरीक्षक संदीप शिंदे, आनंदराव घाडगे आदींच्या नेतृत्वाखाली सहा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते.

