सांगली : पुण्यात गावठी दारू प्राशनामुळे झालेल्या मृत्यूकांडाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलिसांनी अवैध मद्यनिर्मितीविरोधात मोहीम तीव्र केली आहे. त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शनिवारी पहाटेच्या सुमारास कंजारभाट परिसरातील हातभट्टी अड्ड्यांवर धडक कारवाई करत अनेक भट्या उध्वस्त केल्या. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पहाटेच्या वेळी छापा टाकून हातभट्टीद्वारे गावठी दारू निर्मिती करणाऱ्या ठिकाणांवर कारवाई केली.
या मोहिमेत पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत, अभिजित माळकर यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. पोलिसांनी हातभट्टीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले तसेच अवैधरित्या सुरू असलेल्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर दारू निर्मितीचे साहित्य नष्ट करण्यात आल्याची माहिती मिळाली.
पुण्यातील दुर्दैवी घटनेनंतर जिल्ह्यात अशा प्रकारच्या अवैध मद्यनिर्मितीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेशही यातून गेला आहे. जनतेच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
