सांगली : भांडवली मुल्यावर आधारीत घरफाळा आकारणीला विरोध दर्शवण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदमुळे महापालिका क्षेत्रातील व्यवहार मंगळवारी ठप्प झाले होते. शहरातील बहुतांशी दुकाने आज दुपारपर्यंत बंद राहिली. तर घरपट्टी वाढ विरोधी कृती समितीच्यावतीने महापालिकेवर मोर्चा काढून विविध मागण्याचे निवेदन आयुक्त संजीता महापात्रा यांना देण्यात आले. महापालिका क्षेत्रातील मिळकत धारकांना भाडेमुल्यावर आधारित घरपट्टी आकारणी करण्यात आली असून याबाबत हरकती मागविण्यात आल्या होत्या.
मात्र, नागरिकांनी दाखल केलेल्या हरकतीवर सुनावणी न होता वाढीव दराने घरपट्टीची देयके अदा करण्यात आली आहेत. यामुळे कृती समितीच्या माध्यमातून आज बंदचे आवाहन केले होते. बंदमुळे सांगलीतील कापडपेठ, हरभट रोड, मारूती रोड, गणपती पेठेसह उपनगरातही दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तर मिरजेतील तांदूळ मार्केट, शनिवार पेठ, सोमवार पेठेतील दुकाने बंद होती. कुपवाड शहरातील दुकानेही बंद ठेवण्यात आली. शहरातील उपहारगृहे काही प्रमाणात बंद होती. मात्र, बाजार समितीतील काही व्यवहार सुरू राहिले.
दुपारी मोर्चा होईपर्यंत दुकाने बंद राहिली. यानंतर मात्र, शहरातील काही दुकानदारांनी आपले व्यवसाय सुरू केले होते. आजच्या बंदला व्यापारी असोसिएशन, किराणा दुकानदार संघटना, भाजीपाला विके्रता संघटना, शिक्षण संस्था संघासह विविध ४० संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. यामुळे शहरातील सर्व व्यवहार दुपारपर्यंत ठप्प झाले होते. कृती समितीच्यावतीने स्टेशन चौकापासून महापालिका प्रधान कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. प्रशासनाच्या दडपशाही विरोधी यावेळी घोषणा देत हा मोर्चा महापालिका आवारात आला. यावेळी कृती समितीचे सतीश साखळकर, हणमंत पवार, शंभूराज काटकर, प्रा.पद्माकर जगदाळे, रविंद्र वळिवडे, ज्योती आदाटे, आदींनी आयुक्त श्रीमती महापात्र यांना निवेदन दिले.
भांडवली मुल्यावर आधारित करआकारणीबाबत धोरणात्मक निर्णय असून ज्यांच्या हरकती आहेत, त्यांची सुनावणी घेउनच निर्णय घेतले जातील असे सांगून याबाबत महापौरांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समिती अंतिम निर्णय घेइ्रल असेही आयुक्त श्रीमती महापात्र यांनी समितीला सांगितले. वाढीव करआकारणीबाबत महापालिकेची विशेष सभा बोलावण्यात यावी, प्रशासकीय कारकीर्दीत घेण्यात आलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा, ड वर्गिय महापालिका असल्याने अ वर्गाची करआकारणी करण्यात येउ नये आदी मागण्या कृती समितीच्यावतीने करण्यात आला.कृती समितीने पुकारण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून या बंदच्या माध्यमातून जनतेने करवाढीसंदर्भात आपल्या भावना दाखवून दिल्या असून प्रशासनाने या भावनांचा विचार करावा असे समितीच्यावतीने आवाहन करण्यात आले.
