सांगली : या वर्षी जून व जुलै महिन्यात अल्पवृष्टी तर व ऑगस्टमध्ये अतिवृष्टी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जल व्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन केल्यास दुष्काळी परिस्थितीवर मात करता येऊ शकते. यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून काटकसरीने पाणी वापरण्याची गरज व्यक्त करून याबाबत जनप्रबोधन करण्यासाठी हा पंधरवडा उपयुक्त ठरेल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी व्यक्त केला.
सांगली पाटबंधारे मंडळाच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६ च्या नवव्या पुष्पाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. वारणाली वसाहतीतील सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, रोहित कोरे, अभिनंदन हारूगडे, के. एल. मासाळ, प्रज्ञा पाटील, हर्षद यादव आणि राजन डवरी आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, जलव्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत दि. २५ ते २९ एप्रिल या कालावधीत गोदा ते नर्मदा अशी यात्रा काढण्यात येणार आहे. यातून जलप्रबोधनाची चळवळ प्रगल्भ होईल. पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी महत्त्वाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आहे. सांगली व कोल्हापूरमधील पूरव्यवस्थापन व पूर येऊ नये यासाठी सांडपाणी व्यवस्थापनासाठी जागतिक बँकेकडून ६०० कोटी रुपये रुपये निधीची तरतूद करण्यात आली आल्याचे त्यांनी सांगितले.
उपसा सिंचन योजनांचे पाणी बंद जलवाहिनीद्वारे वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी ज्या शेतकर्यांच्या जमिनीतून भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे, त्यांना जमिनीचे वार्षिक भाडे दिले जाणार आहे. पाण्याशिवाय शेती नाही. त्यामुळे शेतकर्यांनी पारंपरिक पद्धतीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यावर भर द्यावा. शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे ते म्हणाले.
नवव्या पुष्पअंतर्गत पीक पद्धती, उत्पादकता वाढ व पाणी नियोजन या विषयांवर कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेत पीक पद्धतीत बदल, उत्पादनवाढ आणि जलसंसाधनांचे कार्यक्षम व्यवस्थापन या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात तज्ज्ञ डॉ. सचिन महाजन व डॉ. श्रीमंत राठोड यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान, जल व्यवस्थापन व उत्पादनवाढीच्या उपायांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
