सांगली : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात मुसळधार पावसाचा मुक्काम गेल्या तीन दिवसापासून कायम असून पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने कृष्णा नदीवरील दोन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर संततधार पावसाने रस्त्याकडेचा बस थांबा कोसळून झालेल्या दुर्घटनेत शिराळा तालुक्यात एक व्यक्ती जखमी झाली.गेल्या २४ तासात शिराळा व वाळवा तालुक्यात दमदार पाउस कोसळत असून सांगली, मिरज शहरात थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळत आहेत. रात्री काही काळ पावसाचा जोर ओसरला होता. मात्र, रविवारी पुन्हा पावसाने जोर धरला आहे. यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत असून वारणा नदीवरील मांगले-सावर्डे पूल व मांगले-बच्चे सावर्डे बंधारा पाण्याखाली गेला आहे. गेल्या दोन दिवसापासून यावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. तसेच कोकरूड ते रेठरे या मार्गावरील बंधारा पाण्याखाली गेला आहे.

शिराळा ते बिऊर मार्गावरील सुगंधानगर येथील बस थांबा सततच्या पावसाने कोसळला. या अपघातात बस थांब्यावर आश्रयासाठी थांबलेले शिवाजी बाळू जरग हे जखमी झाले असून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांनी रूग्णालयात जाउन त्यांची विचारपूस केली.

कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पश्‍चिम घाट परिसरात मुसळधार पाउस पडत असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही सातत्यानेवाढ होत आहे. रविवारी सकाळी सांगलीतील आयर्विन पूलाजवळ पाणी पातळी साडेसात फूटावर पोहचली असून गेल्या २४ तासात दीड फूटांनी वृध्दी झाली आहे. कृष्णा नदीवरील म्हैसाळ (ता. मिरज) व राजापूर (ता. शिरोळ) हे दोन बंधारे पाण्याखाली गेल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात शिराळा व वाळवा तालुक्यात संततधार पाउस कोसळत असला तरी पूर्व भागात मात्र अद्याप मोठ्या पावसाची गरज आहे. जत व आटपाडी या दोन पूर्वेकडील तालुक्या\त हलका पाउस असला तरी मान्सूनपूर्व पाउस चांगला झाला असल्याने खरीप पेरण्यांना आता गती आली आहे. अन्य पश्‍चिम भाग वगळता अद्याप खरीप पेरण्यासाठी अनुकूल पाउस झालेला नसल्याने शेतकर्‍यांनी पेरण्यासाठी घाई करू नये असे आवाहन कृषी अधिक्षक विवेक कुंभार यांनी केले आहे.

चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाउस पडत असल्याने पाणी साठ्यातही वाढ होत आहे. रविवारी सकाळी धरणात १३.३६ टीएमसी पाणीसाठा झाला असून साठवण क्षमता ३४.४० टीएमसी आहे. तर कोयना धरणात २०.९० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ११ मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक ४१.९ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज ७.१, जत १.२, खानापूर ९.४, वाळवा १४.७, तासगाव ६.२, शिराळा ४१.९, आटपाडी ५, कवठेमहांकाळ २.८, पलूस ७.५ आणि कडेगाव १५.१.