सांगली : जीव टांगणीला लावणाऱ्या प्रतिक्षेनंतर बुधवारी जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने हजेरी लावली. शिराळा, वाळवा तालुक्यात मध्यम पाऊस झाला, तर सांगली – मिरज शहरात हलक्या पावसाने शेतकरी वर्गात आशा निर्माण केली. सलग सहा दिवस पावसाने दडी मारल्याने खरीपाच्या पेरण्या स्थगित करण्यात आल्या आहेत.

गेल्या आठवड्यात गुरुवारी पावसाने उघडीप दिली. पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा तडाखा वाढला होता. जिल्ह्यात ३५ टक्के खरीपाच्या पेरण्या झाल्या असून उर्वरित ठिकाणी पावसाच्या विश्रांतीमुळे पेरण्या स्थगित करण्यात आल्या आहेत.

आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात बुधवारी पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. शिराळा आणि वाळवा तालुक्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. सांगली शहरातही सकाळपासून थांबून थांबून पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

पावसामुळे शहरातील काही भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्वेकडील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर आणि तासगाव तालुक्यांमध्ये अद्याप समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून खरीप पिकांसाठी लवकरच पाऊस पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हवामानातील बदलामुळे पुढील काही दिवस जिल्ह्याच्या पश्चिम भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली जात असून, पूर्व भागातही पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याची चिन्हे आहेत.