सांगली : शहरातील राम मंदिर चौकात मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची विनापरवाना प्रतिष्ठापना केल्याची घटना उघडकीस आली असून, यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटे ही बाब लक्षात येताच प्रशासन आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञातांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता चौकात पुतळा बसवला. सकाळी नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर परिसरात चर्चा आणि गर्दी वाढू लागली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई हालचाली केल्या.

महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पुतळा हटविण्याची प्रक्रिया सुरू केली.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे आणि सुधीर भालेराव यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

दरम्यान, या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी खबरदारीचे उपाय वाढवले असून, नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.