सांगली : अन्नाअभावी अशक्त झालेल्या आणि कावळ्यांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी द्राक्षबागेत आश्रय घेतलेल्या दुर्मिळ गिधाडाला वनविभागाने जीवनदान दिले. दक्षिण भारतातील जंगलातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून हे गिधाड सांगलीत दाखल झाले आहे. त्याच्या पाठीवर सॅटेलाइट ट्रॅकर आणि पायात विशिष्ट टॅग आढळल्याने या गिधाडाच्या प्रवासाची माहिती समोर आली आहे. सध्या सांगलीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मिरजेतील बेडग रस्त्यावरील कत्तलखाना परिसरात एक भलामोठा पक्षी घिरट्या घालत असल्याचे टीपू मुजावर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत बचाव पथकातील सचिन साळुंखे आणि राकेश वायदंडे यांना माहिती दिली. संबंधित पक्ष्याचे व्हिडिओ कॉलद्वारे निरीक्षण केल्यानंतर तो दुर्मिळ गिधाड असल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत सावधगिरीने आणि कौशल्याने गिधाडाला पकडून सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले. त्याची प्राथमिक तपासणी केली असता पाठीवर सॅटेलाइट ट्रॅकर बसविलेला, तर पायात टॅग असल्याचे आढळले. दक्षिण भारतातील वनविभागाने संशोधन आणि निरीक्षणासाठी या गिधाडाला ट्रॅकर बसवून मुक्त विहारासाठी सोडले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

वनविभागाने गिधाडाला सुरक्षित ठिकाणी हलवून आवश्यक अन्न आणि ग्लुकोज दिले आहे. शरीरातील अशक्तपणा दूर करून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे नियोजन आहे. गिधाडे ही निसर्गातील अन्नसाखळीतील अत्यंत महत्त्वाची घटक आहेत. मृत जनावरांचे मांस खाऊन परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम गिधाडे करतात. त्यामुळे मृत जनावरांमधून पसरणाऱ्या रेबीज, अँथ्रॅक्स यांसारख्या घातक रोगांचा प्रसार रोखण्यास मदत होते.

या बचाव मोहिमेत उपवनसंरक्षक सागर गवते, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, वनक्षेत्रपाल सजेराव सोनवडकर, वनपाल सुधीर सोनवले, वनरक्षक गणेश भोसले, तुषार भोरे, किरण नाईक, मेघदीप कुदळे, मंदार शिंपी आणि रुपेश साळुंखे यांनी सहभाग घेतला. दुर्मिळ पक्ष्याचे वेळीच रेस्क्यू करून त्याला जीवदान मिळवून दिल्याबद्दल वनविभागाच्या पथकाचे कौतुक होत आहे.