सांगली : खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, बेकायदा शस्त्र बाळगणे, दारू विक्रीसह विविध गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या सांगलीतील ‘आर. के. गँग’वर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख राकेश शामराव कांबळे याच्यासह सात जण आणि दोन बालक अशा आठ जणांविरुद्ध मोक्का कायद्यातील कलमे वाढविण्यास विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी शुक्रवारी मंजुरी दिली.

सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात  खून, बेकायदा जमाव, गंभीर दुखापत, धमकी यासह शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार विविध कलमे आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर करीत होते.

तपासादरम्यान राकेश कांबळे याने लखन पंडीत इसरडे, कृष्णा ऊर्फ मुदक्या कुटनाप्पा कांबळे, करण किशोर शिंदे, महेश विजय नाटेकर, सुनिल ऊर्फ मुक्या निलाप्पा खडते आणि दोन बालकांना सोबत घेऊन ‘आर. के. गँग’ नावाची संघटित गुन्हेगारी टोळी निर्माण केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

सांगली शहर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या परिसरात २०१६ पासून २०२६ पर्यंत या टोळीने गुन्ह्यांची मालिका केल्याचे तपासात समोर आले आहे. वर्चस्व निर्माण करणे, आर्थिक फायदा मिळवणे आणि परिसरात दहशत कायम ठेवण्यासाठी घातक शस्त्रांचा वापर, मारामारी, जबरी चोरी, बेकायदा दारू विक्री तसेच नागरिकांना धमकावणे अशा प्रकारचे गुन्हे केल्याचा पोलिसांचा दावा आहे.

मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी सरकारी अभियोक्त्यांचा अभिप्राय घेऊन पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांनी प्रस्ताव पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे सादर केला. पोलीस अधीक्षकांनी प्रस्तावाचे अवलोकन करून तो विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला होता. या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.

यापुढे संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांवर लक्ष ठेवून त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी सांगली शहरातील वेदांत मारुती बंडगर खून प्रकरणातील ‘एन. जी. ग्रुप’ या टोळीवरही मोक्का कारवाईला मंजुरी देण्यात आली होती. या गुन्ह्याचा पुढील तपास अरुण पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, ईश्वरपूर उपविभाग यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना चारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थायी गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सांगली शहरचे पोलीस निरीक्षक श्री. सुगांवकर आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.