सांगली : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातून विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपचे धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रशांत उर्फ बाळासाहेब पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेसकडून संजय मेंढे, मयूर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप, सीमा पोतदार, किशोर धुमाळ यांच्यासह ९ जणांचे १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत ४ जून रोजी आहे. यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
भाजपचे संख्याबळ सर्वाधिक असल्याने महायुतीत भाजपने ही जागा आपल्याकडे घेतली व श्री. कदम यांची उमेदवारी काल रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आमदार जयंत पाटील यांचे चुलत बंधू प्रशांत उर्फ बाळासाहेब पाटील यांची उमेदवारी दाखल करण्यात आली असून काँग्रेसने अखेरच्या क्षणी संजय मेंढे व मयूर पाटील या दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
भाजपचे उमेदवार श्री. कदम यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खा. उदयनराजे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. गोपीचंद पडळकर, शिवसेना शिंदे गटाचे आ. सुहास बाबर, आ.सदाभाउ खोत, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आदींसह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारी दाखल करण्याच्या आज अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कासेगावचे श्री. पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील, माजी आमदार विक्रमसिंह सावंत आदींसह पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. तर अभयसिंह जगताप यांचा उमेदवारी अर्ज प्रस्तावक सागर पोळ यांनी दाखल केला. याशिवाय सीमा पोतदार यांनीही उमेदवारी दाखल केल्याने शिवसेना शिंदे गटाचे तानाजी पाटील यांच्यासह या निवडणुकीसाठी एकूण ७ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून याचवेळी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारी माघारीची मुदत ४ जूून दुपारी तीन वाजेपर्यंत असून यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री पाटील यांनी भाजपचे श्री. कदम यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला असून शिवसेनेचे श्री. पाटील यांची उमेदवारी जागा वाटपापुर्वी दाखल झाली असल्याने ते माघार घेतील असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीची दोन्ही जिल्ह्यात ताकद असल्याने आपण ताकदीने निवडणूक लढविणार असल्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
