सांगली : विधान परिषदेची निवडणुक होणार हे दुपारी स्पष्ट होताच, मतदार असलेल्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांच्या चेहर्यावर हसू फुलले.ही निवडणूक अविरोध करण्याच्या पडद्याआड हालचाली सुरू असल्याने मतांचे मोल बुडते की काय ही धास्ती होती, ही धास्ती गुरूवारी दुपारी दूर झाल्याने चेहर्यावर हास्य फुलले.
सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य गटातून विधान परिषद सदस्य निवडीसाठी निवडणुक जाहीर झाल्यानंतर ही निवडणुक अविरोध होते, की चुरशीची होते याकडे बहुसंख्य मतदारांचे लक्ष लागून राहिले होते. ही निवडणुक अविरोध होउ नये यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीतील काहींनी उमेदवारी अर्जही दाखल केले होते. अखेर महायुती व महाविकास आघाडी यांच्यात लढत होत असल्याचे स्पष्ट होताच, मतदारांना दिलासा मिळाला.
या निवडणुकीसाठी एकूण ८९५ मतदार असून कागदोपत्री महायुतीचे पारडे जड आहे. गुप्त मतदान प्रक्रिया असल्याने या मतदानासाठी पक्षाचा व्हीपही जारी होउ शकत नसल्याचे काहींचे म्हणणे आहे. यामुळे पक्ष विरोधी मतदान केल्याचा ठपकाही बसू शकत नाही, आणि पक्षाच्या कारवाईपासूनही मुक्तता मिळत असल्याने ही निवडणुक म्हणजे मताचे मोल करण्याची निवडणुक मानली जाते. यामुळे जेवढी चुरस जास्त तेवढी बिदागीही घसघशीत मिळण्याची आशा आहे.
सहा महिन्यापुर्वी झालेल्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत वारेमाप खर्च करून विजय मिळवला. या निवडणुकीसाठी झालेला खर्च वसूल करण्याची ही संधी असल्याने अनेक मतदारांच्या मनात लक्ष्मी दर्शनाची आस आहे. ही फलद्रुप होते की नाही हे लवकरच लक्षात येईल. मात्र, या निमित्ताने मतदारांच्या चेहर्यावर हास्य फुुलले आहे.
या गटातून गेल्यावेळी म्हणजे २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी काँग्रेसचे मोहनराव कदम आणि राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांच्यात लढत झाली होती. तर अपक्ष म्हणून सांगलीचे शेखर माने हे मैदानात होते. त्यावेळी काँग्रेसचे संख्याबळ कमी असतानाही स्व. पतंगराव कदम यांनी निवडणुकीत चमत्कार घडवून काँग्रेसचा विजय घडवून आणला होता. त्यावेळी नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांना पाच लाखापासून बारा लाखापर्यंतचे पाकिट घरपोच झाले होतेे. यावेळी निवडणूक अविरोध झाली तर या अघोषित बिदागीवर पाणी सोडण्याची वेळ येईल म्हणून धास्ती होती. आता ही धास्ती मिटली असून बिदागीच्या पाकिटाची आस निर्माण झाली आहे. आता नेत्यांकडून कधी निरोप येतो याची प्रतिक्षा मतदाराना लागली आहे.
